स्वप्नासाठी ‘त्यानं’ गाव सोडलं अन् जिद्दीला जवळ केलं....
By Admin | Updated: November 9, 2014 01:48 IST2014-11-09T01:48:12+5:302014-11-09T01:48:48+5:30
अल्पावधीत चमकदार कामगिरी

स्वप्नासाठी ‘त्यानं’ गाव सोडलं अन् जिद्दीला जवळ केलं....
अनिल कासारे ल्ल लांजा
शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला विचारले, तुम्ही मोठे झाल्यावर तुम्ही कोण होणार... वर्गामधील विद्यार्थ्यांनी मी डॉक्टर, वकील, इंजिनिअर, सीए अशी उत्तरे दिली. मात्र एका विद्यार्थ्यांनी मी क्रिकेटर होणार असे म्हणताच वर्गातील सर्व विद्यार्थी मोठमोठ्यांनी हसले. पण त्यांनी मुले हसण्याचा राग न करता आपण क्रिककेटर होणारच हे मनी बाळगलेले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्याच्या वडिलांनी आपले गाव व रहाते घर सोडून कोल्हापूर गाठले. आज त्याच विद्यार्थ्याची क्रिकेटमधील १९ वर्षाखालील शासकीय महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाली आहे.
लांजा तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर असलेले कुवे गाव मध्यमवर्गीय आई-वडील, आजी-आजोबा, लहान बहीण अशा कुटुंबात साईल विकास शिबे याचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्याला क्रिकेटचे वेड होते. कुवे येथील मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत त्याचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर साईल यांनी शाळेत मी क्रिकेटर होणार हे म्हटल्यावर मुलं हसली असे त्यांनी येवून आपले बाबा विकास शिबे यांना सांगितले. त्यावेळीच साईलचे बाबा यांनी निर्णय घेवून टाकला.
क्रिकेटमध्ये साईल याला त्यांनी कोल्हापूर हे शहर निवडत आपल्या कुटुंबियांना घेवून कोल्हापूर गाठले. विकास शिबेचा प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय असल्याने व्यवसाय अधिक जोमाने करुन आपल्या मुलाला क्रिकेटर बनवायचे हे स्वप्न पक्के केले.
मुलांच्या शिक्षण व क्रिकेट यांच्यामध्ये त्याचे भविष्य घडत्तण्याच्या दृष्टीने आपले गाव व घर सोडून कोल्हाूपर येथे दाखल झालेले शिबे कुटुंबियांनी साईल याचा शाहुपुरी जिमखान्यावर प्रशिक्षणासाठी दाखल केले. अल्पावधीत साईल शिबे याने जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये आपली चमकदार कामगिरी केली. सन २००९ मध्ये सामनावीर व बेस्ट बॉलर पुरस्कार, ग्लोबल (केडीसीए) असा चढता आलेख त्याने चालू ठेवला.
क्रिकेटमध्ये साईल शिबे यांनी सन २०१० मध्ये करवीर चषकामध्ये सामनावीर व उत्कृष्ट गोलंदाज तसेच बेस्ट स्कोअरर ग्लोबल (केडीसीए) सन २०११ ग्लोबल चषक बेस्ट बॅटस्मन एक्सलंट प्लेअर (केडीसीए) तसेच १५ वर्षाखालील केएसएमध्ये मॅन आॅफ द सिरीज व बेस्ट बॅटस्मन, सन २०१२ सहारा क्रिकेट अॅकॅडमी इचलकरंजी आयोजित मॅन आॅफ द सिरीज तसेच तात्यासाहेब सरनोबत चकमध्ये बेस्ट बॅटस्मन, भोपेराव कदम चषकामध्ये बेस्ट स्कोअरर तसेच सन २०१२-१३ मध्ये १६ वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए)च्या संघात निवड करण्यात आली.
क्रिकेटमध्ये भरीव कामगिरी केल्याने या कुवे गावच्या सुपूत्राची, साईल शिबे याची १९ वर्षाखालील शासकीय महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात नुकतीच निवड करण्यात आली आहे.
ग्रामीण भागात आपल्या गावी क्रिकेटसाठी पोषक वातावरण व शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळणार नाही, याची खात्री असल्याने आपले गाव सोडावे लागते. बाबांनी केलेल्या त्यागाची, प्रत्येक क्षणाची आठवण ठेवल्याने मी यशस्वी होत गेलो, अशी प्रतिक्रिया साईल यानी दिली. सध्या साईल शिबे हा १२ वीमध्ये शिक्षण घेत आहे.