डॉ. नरेंद्र दाभोलकर विचार जागर सप्ताहाला आजपासून प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:37 IST2021-08-14T04:37:11+5:302021-08-14T04:37:11+5:30
रत्नागिरी : डॉ. नरेंद्र दाभोलकर विचार जागर सप्ताहाला १४ ऑगस्टपासून प्रारंभ करण्यात येणार असून, ते २० ऑगस्ट रोजी ...

डॉ. नरेंद्र दाभोलकर विचार जागर सप्ताहाला आजपासून प्रारंभ
रत्नागिरी : डॉ. नरेंद्र दाभोलकर विचार जागर सप्ताहाला १४ ऑगस्टपासून प्रारंभ करण्यात येणार असून, ते २० ऑगस्ट रोजी त्याची सांगता होणार आहे. यानिमित्त रोज सायंकाळी ६ वाजता विविध स्मृती व्याख्यानांचे ऑनलाईन आयाेजन करण्यात आले आहे.
विज्ञानवादी, विवेकवादी विचारसरणीचे डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला २० ऑगस्ट रोजी आठ वर्षे पूर्ण होत आहेत. दरवर्षी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते व समविचारी संघटनांतील साथी एकत्र येऊन देशभर डॉ. दाभोलकर यांच्या खुनाचा निषेध करून त्यांचे काम जोमाने पुढे घेऊन जाण्याचा निर्धार करतात. राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन म्हणून २० ऑगस्ट रोजी देशात ठिकठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जागर करणारे कार्यक्रम आयोजित केले जातात. पुणे येथे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर स्मृतिव्याख्यान आयोजित केले जाते.
यावर्षीदेखील दिल्ली, आसाम, मध्यप्रदेश, हरियाणा, पंजाब, झारखंड, हिमाचलप्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ या राज्यांमध्ये हे कार्यक्रम घेतले जाणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार आणि द हिंदू या वृत्तपत्राचे माजी संपादक पी. साईनाथ या स्मृतिव्याख्यानासाठी वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. ते भारतीय ‘लोकतंत्र और विवेकवादी शक्तियों के सम्मुख चुनौतियां’ या विषयवार विचार मांडणार आहेत. कोरोना संकटामुळे स्मृतिव्याख्यान ऑनलाईन आयोजित करण्यात आले आहे.
शनिवार, दि. १४ रोजी ‘अंधरूढींच्या बेड्या तोडा’ अभियानांतर्गत २०० महिलांच्या जटा निर्मूलन करणाऱ्या अंनिसच्या पुण्यातील कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांची जाहीर मुलाखत होणार आहे. रविवार, दि. १५ रोजी ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ या विषयावर अंशुल छत्रपती यांची जाहीर मुलाखत होणार आहे.
सोमवार, दि. १६ रोजी ‘सामाजिक चळवळी आणि माध्यमे’ यावर संजय आवटे यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे.
मंगळवार, दि. १७ रोजी बालसाहित्याच्या पाच पुस्तकांचा प्रकाशन सोहळा होणार आहे. बुधवार, दि. १८ रोजी राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन कार्यक्रम, राष्ट्रीय परिसंवाद आयोजित केला आहे. गुरुवार, दि. १९ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत भोर (जि. पुणे) येथे डॉ. नरेंद्र दाभोलकर विचार संमेलन होणार आहे.
सात दिवस होणाऱ्या या कार्यक्रमांसाठी सहभागी होण्यासाठी https://us02web.zoom.us/j/82993944572?pwd=WGlmYzZHNUlTUTRickRaR3ZSSkptUT09 ही एकच झूम लिंक आहे. त्यासाठी
आयडी ८२९९३९४ ४५७२, तर पासकोड Mani हा आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन रत्नागिरी महाराष्ट्र अंनिसने केले आहे.