कोकण रेल्वेमार्गावर आजपासून डबलडेकर
By Admin | Updated: December 5, 2015 23:37 IST2015-12-05T23:35:58+5:302015-12-05T23:37:32+5:30
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या गाडीचा करणार शुभारंभ

कोकण रेल्वेमार्गावर आजपासून डबलडेकर
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून मुंबई ते मडगाव अशी वातानुकुलीत डबलडेकर पुन्हा धावणार आहे. येत्या ६ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता ही गाडी मडगावहून मुंबईकडे धावणार असून, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या गाडीचा शुभारंभ करणार आहेत.
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे डबलडेकर सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही गाडी सुरू करण्यात आली आहे. या मार्गावरील प्रवाशांचीही मागणी होती.
लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून ही डबलडेकर सोमवार, बुधवार व शुक्रवारी सकाळी ५.३० वाजता सुटणार आहे. मंगळवार, गुरूवार व शनिवार या तीन दिवशी ही गाडी मडगाव येथून सकाळी ६ वाजता सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सायंकाळी ५.१० वाजता पोहोचेल. ठाणे, पनवेल, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी या स्थानकांवर या डबलडेकर गाडीला थांबे देण्यात आले आहेत.
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कोकणवासियांच्या वाट्याला ‘अच्छे दिन’ येऊ लागले आहेत. कोकण रेल्वे मार्गावर अनेक सुविधा होऊ लागल्या आहेत. नवीन रेल्वे स्थानकांची कामेही आता सुरू झाली आहेत. कोकणवासियांना आता वातानुकुलित डबलडेकरचा आनंद घेता येणार आहे. (प्रतिनिधी)