रत्नागिरी : गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावर सुरु करण्यात आलेली व अधिक तिकीटदरामुळे फसलेली वातानुुकूलित डबल डेकर रेल्वे दिवाळीत पुन्हा धावणार आहे. या गाडीचे प्रीमियम तिकीटदर मागे घेत नियमित दराने ही गाडी चालवली जाणार आहे. मुंबईहून रत्नागिरीत येण्यासाठी या गाडीला प्रतिप्रवासी आता भोजनासह ७२० रुपये मोजावे लागणार आहेत. हे प्रवासभाडे परवडणारे असल्याने दिवाळीत या गाडीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जवळपास जनशताब्दीच्या वातानुकूलित बोगीच्या धर्तीवर ही डबलडेकर चालवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच मुंबई ते रत्नागिरी वा रत्नागिरी ते मुंबई हा प्रवास प्रतिप्रवासी ७२० रुपयात करणे शक्य होणार आहे. यामध्ये ५५० रुपये प्रवासी भाडे असून, भोजनखर्च १७० रुपये आकारला जाणार आहे. जनशताब्दी गाडीतही सुरुवातीला भोजन दिले जात होते. नंतर भोजन बंद करून तेवढा आकार तिकीट भाड्यातून वजा करण्यात आला होता. त्यामुळे जनशताब्दी गाडीला आता अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे मार्गावर मध्य रेल्वेने वातानुकूलित डबलडेकर सुरू केली.प्रीमियम दरामुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांना आताच्या दरापेक्षा तब्बल दुप्पट भाडे मोजावे लागणार हे लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी या गाडीकडे पाठ फिरवली होती. आता कोकण रेल्वे जमिनीवर आल्याने कोकणवासीही या सेवेचा लाभ घेण्यासाठी पुढे येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांच्या काळापासून मुंबई-गोवा महामार्गावरून धावणाऱ्या लक्झरी गाड्याही हंगामात व अन्य वेळीही किमान हजार ते बाराशे रुपये तिकीट गोव्यासाठी आकारतात. कोकणात येण्यासाठी हे भाडे सातशे ते आठशे आहे. त्यामुळे त्याच स्तरावर डबलडेकर रेल्वेचे भाडे ठेवले गेले असते तर गणेशोेत्सवकाळातच या गाडीला चांगला प्रतिसाद मिळाला असता अशी कोकणवासीयांची प्रतिक्रिया आहे. आता ‘देर आये दुुरुस्त आये’ या उक्तीप्रमाणे हा बदल झाला आहे. त्यामुळे दिवाळीत सुरू होणारी डबलडेकर नंतर याच मार्गावर कायम सुरू राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
डबलडेकरने ७२० रुपयांत गाठा मुंबई
By admin | Updated: September 17, 2014 22:26 IST