बेफिकिरी नको; सावधानता हवी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:37 IST2021-09-14T04:37:14+5:302021-09-14T04:37:14+5:30
गणेशोत्सवासाठी मुंबई-पुण्यातून एक लाख ९०० लोक आले आहेत. त्यापैकी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन डोस व आरटीपीसीआर चाचणी केलेल्या सवलत ...

बेफिकिरी नको; सावधानता हवी...
गणेशोत्सवासाठी मुंबई-पुण्यातून एक लाख ९०० लोक आले आहेत. त्यापैकी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन डोस व आरटीपीसीआर चाचणी केलेल्या सवलत देण्यात आली असून, ६१,९१६ मुंबईकरांना थेट प्रवेश देण्यात आला आहे. प्रशासनाकडून ७२५ आरटीपीआर चाचण्या व ८ हजार १३५ मुंबईकरांची अँटिजन चाचणी करण्यात आली आहे. ३१ हजार १४० जण कोरोना चाचणीशिवाय गावात आले असून, त्यांची नावे ग्रामकृती दलाकडून पाठविण्यात आली असून, त्यांच्या चाचण्या करण्याचे आदेश प्रशासनाने दिले असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही सूचना देण्यात आल्या असून तपासणीचे काम सुरू करण्यात आले आहे. आपला जिल्हा भौगोलिकदृष्ट्या डोंगरदऱ्यांमध्ये वसलेला आहे. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या सुविधा, औषधसाठा, आरोग्य यंत्रणा याचे भान बाळगून शासनाच्या नियमावलींचे पालन केले, लसीकरण व कोरोना चाचणीसाठी सहकार्य लाभले तर नक्की कोरोना आटोक्यात येण्यास मदत होईल. कोरोनाग्रस्तांची घटलेली संख्या शून्यावर आणण्यासाठी प्रशासनाला साथ देण्याची आवश्यकता आहे. शासनाकडून मोफत लसीकरण सुरू असतानाही, अद्याप काहींनी पहिला डोसही घेतलेला नाही. गावपातळीवर कोरोना चाचणी करण्यात येत असताना, भीतीमुळे ग्रामस्थांचा प्रतिसाद लाभत नाही. शासनाकडून तर कोरोना उपचार केंद्रांची संख्या वाढविण्यात आली असली तरी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारा वर्ग जिल्ह्याबाहेर जाऊन उपचार घेऊ शकतो. मात्र सर्वसामान्यांना शासकीय यंत्रणेवरच अवलंबून रहावे लागते. कोरोनाच्या धसक्यामुळे कित्येकांनी जीवही गमावले आहेत. परिणामी जिल्ह्यावर असलेल्या संकटावर मात करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, परंतु प्रत्येकाने आपले कर्तव्य ओळखून प्रशासनाला साथ देण्याची आवश्यकता आहे. बेफिकिरीऐवजी सावधानता, सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे.