कोरोनाबाबत भीती नको, परंतु सतर्कता हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:32 IST2021-05-12T04:32:23+5:302021-05-12T04:32:23+5:30
फोटो आहे. ११ नाकाडे फोल्डरला मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : प्राणांशी झुंज देणारे रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांची ...

कोरोनाबाबत भीती नको, परंतु सतर्कता हवी
फोटो आहे. ११ नाकाडे फोल्डरला
मेहरून नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : प्राणांशी झुंज देणारे रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांची वाॅर्डाबाहेर असलेली घालमेल पाहता, निरोगी असणाऱ्यांची बेफिकिरी अयोग्य आहे. कोरोना संसर्गाबाबत सोपे घेऊ नका, मात्र भीतीही नको; परंतु सतर्कता बाळगत, वेळेवर उपचार घेतले, तर नक्कीच कोरोनावर मात करून बाहेर पडता येते. नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतानाच ‘रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा’ हे ध्येय स्नेहा आंब्रे यांनी बाळगले होते. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर सध्या काेरोना रुग्णालयात रुग्णसेवेत कार्यरत आहेत. गंभीर रुग्णांची वेदना असह्य करते. त्यांना वाचविण्यासाठी डाॅक्टरांची मेहनत व धावपळ भावनिक करते, असे स्नेहा हिने सांगितले.
आठवड्याभरापूर्वीच कोरोना रुग्णालयातील सेवेत दाखल झाले आहे. माझी आई आरोग्यसेविका व वडील ग्रामकृतीदलाचे सदस्य आहेत. दोघेही कोविड योध्दे आहेत. कोरोना रुग्णालयातील सेवेसाठी ज्यावेळी निवड झाली, तेव्हा भीती होती, मात्र आई-वडिलांनी मला रुग्णसेवेची संधी प्राप्त झाल्याची जाणीव करून देत प्रोत्साहन दिले. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच रुग्णालयात तीन विविध शिफ्टमध्ये सेवा बजावताना, वाॅर्डातील दाखल रुग्ण, त्यांच्यावरील उपचार याचा अभ्यास करण्याबरोबर सेवेची संधी प्राप्त झाली असल्याचे स्पष्ट केले.
रुग्णालयातील सेवेच्या पहिल्यादिवशी पीपीई कीट डोक्यापासून पायापर्यंत परिधान करण्यात आला. तीन लेअरचा मास्क लावल्यानंतर सुरुवातीला फारच गुदमरायला झाले, मात्र हळूहळू सवय झाली. रात्रपाळीसाठी ड्युटी होती. व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णाची ऑक्सिजन पातळी हळूहळू खालावली. ज्येष्ठ नर्सेसना याची कल्पना देताच, त्यांनी काही औषधे देऊन कृत्रिम ऑक्सिजन मात्रा वाढविली; मात्र काहीच उपयोग झाला नाही. लगेच डाॅक्टरांना कल्पना देण्यात आली. डाॅक्टरांनी काही औषधे दिली. रुग्णाच्या छातीवर दाब देण्यास सुरुवात केली. अथक परिश्रमानंतर रुग्ण ‘स्टेबल’ झाला. डाॅक्टरांसह आम्हा सर्वांचा जीव भांड्यात पडल्याचे स्नेहा हिने सांगितले. जीव वाचविण्यासाठी डाॅक्टरांची तत्परता व प्रयत्न सुरू असतानाच, त्यांच्या चेहऱ्यावरील चिंता स्पष्ट जाणवते. जेव्हा रुग्ण नाॅर्मल होतो, त्यावेळचे समाधान मात्र वेगळेच असते.
कफ मोठ्या प्रमाणावर झाल्याने खोकणारे रुग्ण, श्वास घेताना त्यांना होणारा त्रास, ऑक्सिजन मात्रा कमी झाल्यावर त्यांची होणारी तडफड यामुळे काही रुग्णांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम जवळून अनुभवता येत आहे. वेदनांपेक्षा मृत्यू बरा, अशी धारणा झाल्यानंतर त्यांना ज्येष्ठ नर्सेस, डाॅक्टर देत असलेला दिलासा आम्हाला खूप काही शिकवून जातो. रुग्णांशी जेव्हा बोलतो, त्यांची चाैकशी करतो, तेव्हा त्यांनाही बरे वाटते. कारण नातेवाईक त्यांचे दूर असतात, त्यावेळी जवळ आम्ही असतो. बरे झालेले रुग्ण तर डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतात, तेव्हा देव पावल्याची जणू अनुभूती येत असल्याचे स्नेहा ने सांगितले.
माझी व माझ्या मैत्रिणीची नर्सिग क्षेत्रातील नोकरीची सुरूवात आहे. परंतु गेल्या सात दिवसात आलेले अनुभव नक्कीच माैलिक आहेत.
कोरोना रुग्ण आजींची प्रकृती चांगली होती. उपचारासाठी चांगला प्रतिसाद होता. रात्रीचे जेवण त्या स्वत:च्या हाताने जेवल्या. मी औषधे दिली, तीही घेतली. बरे वाटत असल्याचे सांगितले, मलाही समाधान वाटले. सकाळी ड्युटी संपल्यावर मी वसतिगृहात परतले. दुसऱ्या दिवशी पुन्हा नाईट ड्युटीसाठी आल्यानंतर मला त्या बेडवर आजी दिसल्या नाहीत, मला वाटले त्यांना अन्य वाॅर्डात शिफ्ट केले असेल. मी आजींबाबत सिनिअरकडे चाैकशी केली असता, आजीचे निधन झाल्याचे कळताच हृय हेलावले. एकूणच परिस्थिती कठीण आहे, परंतु प्रत्येकाने काळजी घेतली, तर कोरोना लवकरच संपेल. भावनिक न होता मन घट्ट करून सेवा अधिक चांगल्या पध्दतीने देण्याचा धडा मात्र मिळाल्याचे स्नेहा हिने सांगितले.