शासकीय रक्तपेढीने केला दात्यांचा गाैरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:22 IST2021-07-02T04:22:15+5:302021-07-02T04:22:15+5:30
रत्नागिरी : प्रत्येक वेळी रक्तदानासाठी पुढे येऊन जिल्हा शासकीय रुग्णालयाला रुग्णसेवेत मदतीचा हात देणारे रक्तदाते आणि शिबिर आयोजक यांचा ...

शासकीय रक्तपेढीने केला दात्यांचा गाैरव
रत्नागिरी : प्रत्येक वेळी रक्तदानासाठी पुढे येऊन जिल्हा शासकीय रुग्णालयाला रुग्णसेवेत मदतीचा हात देणारे रक्तदाते आणि शिबिर आयोजक यांचा जागतिक रक्तदाता दिनानिमित्त मंगळवारी गौरव करण्यात आला. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी २५ पेक्षा अधिक रक्तदान करणारे दाते आणि कोरोनाकाळात शिबिरांचे शिवधनुष्य पेलणारे सुमारे २० आयोजक यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाचे संकट असतानाच विविध ठिकाणी होणारे अपघात तसेच अनेक गंभीर आजारांचे रुग्ण यांच्यासाठी रक्ताची मागणी वाढली आहे. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत शासकीय तसेच खासगी रुग्णालयांत दाखल असणाऱ्या रुग्णांसाठी (विशेषत: हृदयशस्त्रक्रिया, डायलिसीस) नि:शुल्क रक्तपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाला दिवसाला सुमारे ३० ते ३५ रक्ताच्या पिशव्यांची गरज भासू लागली आहे. काही वेळा रक्ताचा तुटवडा पडतो, अशा वेळी विविध सामाजिक संस्था, आस्थापना, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते रक्तदानासाठी सरसावतात.
कोरोनाकाळातील बिकट परिस्थितीतही या दात्यांनी तसेच विविध सामाजिक, धार्मिक संस्थांनी जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्ताचा पुरवठा अखंडित ठेवला. त्यामुळे त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या वेळी सह जिल्हा शल्य डाॅ. शिवदास चव्हाण, डाॅ. राजश्री ढवळे, जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डाॅ. अर्जुन सुतार आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात विविध रक्तदात्यांचा, शिबिर आयोजकांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा शासकीय रक्तपेढीला पुरवठा कमी पडू नये, यासाठी जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डाॅ. अर्जुन सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली मेहनत घेणारे जनसंपर्क अधिकारी योगिता सावंत आणि अन्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. संघमित्रा फुले यांनी या सर्व दात्यांचे आणि शिबिराचे आयोजन करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांचे आभार मानले. या वेळी त्यांनी रक्तपेढीच्या कार्याचाही गौरव केला. डाॅ. ढवळे यांनीही मनोगत व्यक्त केले.
रक्तदाते आणि शिबिर आयोजकांपैकी काहींनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. प्रस्तावनेत डाॅ. अर्जुन सुतार यांनी रक्तपेढीच्या कार्याची माहिती दिली. जनसंपर्क अधिकारी योगिता सावंत यांनी सूत्रसंचालन करताना रक्तदानाचे महत्त्व विशद केले. रक्तपेढी अधिपरिचारक प्रभाकर मुळेकर यांनी आभारप्रदर्शन केले.