शैक्षणिक साहित्याची देणगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:32 IST2021-05-12T04:32:01+5:302021-05-12T04:32:01+5:30
फळांना मागणी रत्नागिरी : रमजान सुरू असल्याने फळांना वाढती मागणी होत आहे. केळी, सफरचंद, चिकू, पेरू, डाळिंब, अननस, पपई, ...

शैक्षणिक साहित्याची देणगी
फळांना मागणी
रत्नागिरी : रमजान सुरू असल्याने फळांना वाढती मागणी होत आहे. केळी, सफरचंद, चिकू, पेरू, डाळिंब, अननस, पपई, कलिंगड तसेच आंब्यासाठी मागणी होत आहे. मुंबईतून फळांची आवक होत असून लाॅकडाऊनमुळे आवक रोडावली आहे. त्यामुळे फळांचे दरही कडाडले आहेत.
पालकांना दिलासा
रत्नागिरी : कोरोना काळात शाळा बंद असून, काही शाळा ऑनलाईन पद्धतीने वर्ग भरवत आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक पालकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांना शुल्क कमी करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने केल्या असल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे.
रस्ता दुरुस्तीची मागणी
रत्नागिरी : तालुक्यातील बसणी ते गणपतीपुळे मार्गावरील रस्ते निकृष्ट झाले आहेत. ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्ता दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला असला तरी प्रत्यक्षात काम केव्हा सुरू होणार याबाबत ग्रामस्थांना प्रतीक्षा लागली आहे. पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
परीक्षेच्या तारखा जाहीर कराव्यात
रत्नागिरी : शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असल्या तरी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचे सांगितले आहे; मात्र याबाबत अद्याप तारखा व वेळापत्रक जाहीर केलेल्या नसल्याने पालक, विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाने परीक्षेच्या तारखा लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी होत आहे.
आर्थिक संकट
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरच्या कडेला बसून कोकणी मेवा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. आंबे, काजूसह, फणस, करवंदे, जांभळे, जाम विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या विक्रेत्यांवर उपासमार ओढावली आहे. गतवर्षीही विक्रेत्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले होते.
हमीभावाची मागणी
रत्नागिरी : यावर्षी आंबा उत्पादक कमी असल्याने कॅनिंगसाठी प्रक्रिया उद्योजकांनी अन्य राज्यांतून माल आणण्यापेक्षा स्थानिक माल विकत घ्यावा. दर्जेदार आंब्याला प्रतिकिलो किमान ४० रुपये भाव देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे.
माकडांचा उपद्रव
रत्नागिरी : तालुक्यातील टेभ्ये, चांदेराई, हरचेरी परिसरात माकडांचा उपद्रव वाढला आहे. नारळी, आंबा बागायतीसह भाजीपाला पिकांची नासाडी करीत आहेत. कौलारू घरात शिरून अन्नपदार्थात खाऊन फस्त करीत आहेत. ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
भूमिगत वाहिनीची कामे सुरू
रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत शहर तसेच आसपासच्या गावातून भूमिगत वाहिनीचे काम सुरू आहे. परटवणे ते शिरगावपर्यंत काम जोरात सुरू असल्याने वाहन चालकांना वाहन खबरदारी घेत चालवावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे रस्त्यावरील वर्दळ कमी असल्याने कामाला वेग आला आहे.
भाज्यांची आवक रोडावली
रत्नागिरी : सध्या बाजारातून भाज्यांची आवक रोडावली आहे. पाण्याची पातळी खालावल्याने भाजी उत्पादनावर परिणाम झाला आहे. पालेभाज्यांसह कोथिंबीर आवक कमी झाल्याने दरात मात्र वाढ झाली आहे. २० ते २५ रुपये जुडी दराने विक्री सुरू आहे. अन्य भाज्यांचे दर शंभराच्या घरात असल्याने भाजीपाला खरेदीवर परिणाम झाला आहे.