पशुधन पर्यवेक्षक यांची बदली करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:37 IST2021-08-14T04:37:20+5:302021-08-14T04:37:20+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : तालुक्यात पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय ...

Do not replace livestock supervisors | पशुधन पर्यवेक्षक यांची बदली करू नका

पशुधन पर्यवेक्षक यांची बदली करू नका

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : तालुक्यात पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यातच कुंभार्ली व कळकवणे येथील पशुधन पर्यवेक्षकांपैकी एकाची जिल्हा बदली तर दुसऱ्या कर्मचाऱ्याची बदली होत असून तेथील पशुवैद्यकीय केंद्र बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जोपर्यंत या दोन पशुवैद्यकीय दवाखान्यात नवीन कर्मचारी हजर होत नाही, तोपर्यंत संबंधितांना कार्यमुक्त करू नये, अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा पंचायत समितीतील शिवसेना गटनेते राकेश शिंदे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबत शिंदे यांनी गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांना निवेदन देऊन पशुवैद्यकीय विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या मनुष्यबळाविषयी वस्तुस्थिती मांडली आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, पावसाळ्यात जनावरांना विविध प्रकारचे आजार होतात. त्यांना तातडीने उपचाराची गरज असते; मात्र पशुवैद्यकीय विभागात कर्मचारी संख्या कमी असणे, एकाच व्यक्तीकडे अधिकचा कार्यभार असणे, यामुळे हा महत्त्वाचा विभाग आधीच अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीत पूर्व विभागात पशुसंवर्धन विभाग कर्मचाऱ्यांअभावी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

कुंभार्ली येथील पशुधन पर्यवेक्षक भोये यांची जिल्हा बदली झाली आहे. कळकवणे येथील पशुधन पर्यवेक्षक वेलणकर यांचीही बदली होत आहे. या दोन कर्मचाऱ्यांची बदली झाल्यास अर्धा तालुका पशुसंवर्धन विभागाच्या सेवेपासून पूर्णत: वंचित राहणार आहे. त्यामुळे जोपर्यंत नवीन कर्मचारी हजर होत नाही, तोपर्यंत संबंधित पशुधन पर्यवेक्षक यांना कार्यमुक्त करू नये. दुर्दैवाने ही दोन पशुवैद्यकीय केंद्र कर्मचाऱ्यांअभावी बंद राहिली तर नाईलाजास्तव आंदोलनाचा पवित्रा हाती घ्यावा लागेल. यासाठी अन्यायग्रस्त शेतकरी पशुपालक यांना घेऊन चिपळूण पंचायत समितीमधील पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकून ते बंद करेन, असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.

-----------------------

निसर्ग, तौक्ते चक्रीवादळ, महापूर, अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीमध्ये इथला शेतकरी उद्‌ध्वस्त झाला आहे. शेतीचे नुकसान झाले आहे. जनावरे वाहून गेली आहेत. जखमी झाली आहेत. अशा परिस्थितीत त्याचे पशुधन संकटात जाऊ नये. तालुक्यातील पशुसंवर्धन विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या, आवश्यक संख्या, अतिरिक्त कार्यभार, तालुक्याची भौगोलिक रचना यांचा आढावा प्रशासनाने घ्यावा.

- राकेश शिंदे, शिवसेना गटनेते, चिपळूण.

Web Title: Do not replace livestock supervisors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.