ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणाला बाधा आणू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2015 23:47 IST2015-09-17T23:29:59+5:302015-09-17T23:47:59+5:30
गोपाळ निगुडकर : ग्राहक हक्क परिषदेची बैठक

ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणाला बाधा आणू नका
रत्नागिरी : वाहतुकीच्या नियमांचे कोटेकोर पालन करुन अपघात टाळावेत. तसेच विक्रेत्यांनी ग्राहकाला अवाजवी दराने वस्तूंची विक्री करु नये, ग्राहकांच्या हक्काच्या संरक्षणाला बाधा आणू नये, असे आवाहन जिल्हा स्तरीय ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जिल्हास्तरीय ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक झाली. यात विविध सेवा पुरवठारांशी संबंधीत शासकीय व निमशासकीय यंत्रणांकडून पुरवठा दारांकडून ग्राहकांना मिळणाऱ्या सेवांची नियमितता, दर्जा, वाजवी दर याबाबत आढावा घेण्यात आला. प्रामुख्याने महावितरण, टेलिफोन, पुरवठा विभाग, प्रादेशिक परिवहन, अन्न व औषध प्रशासन आदी खात्यांच्या नियंत्रणाखालील सेवांचा आढावा घेण्यात आला. बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी नीता शिंंदे, जिल्हास्तरीय ग्राहक संरक्षण परिषदेचे शासकीय तसेच अशासकीय सदस्य उपस्थित होते.
बैठकीत सदस्यांनी जनतेला मिळणाऱ्या सेवांबाबत आपली मते मांडली. याबाबत मार्गदर्शन करताना अपर जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर यांनी आॅटोरिक्षांनी मीटरप्रमाणे भाडे आकारणी करावी, तसेच सर्वांनी वाहतुकीचे काटेकोर पालन करुन अपघात टाळावे. नियमांचे योग्य पालन होत नसेल तर सहाय्यक प्रादेशिक परिवहन कार्यालयाने तसेच वाहतूक पोलिसांनी नियमांची अंमलबजावणीसाठी आवश्यक ती कारवाई करावी, अशा सूचना दिल्या. याशिवाय बाजारात दूध विक्री अवाजवी दराने होत असेल तर याबाबतही कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. (प्रतिनिधी)