हल्ल्याचे भांडवल करु नका
By Admin | Updated: August 7, 2014 00:30 IST2014-08-06T21:13:45+5:302014-08-07T00:30:08+5:30
उमेश कोरगावकर : दीपक केसरकर यांना दिले प्रत्युत्तर

हल्ल्याचे भांडवल करु नका
सावंतवाडी : शिवसेनेत असताना कुडाळ- पावशी येथे माझ्यावर राजकीय हल्ला हा काही गैरसमजातून झाला होता. त्या घटनेशी पालकमंत्री नारायण राणे यांचा कोणताही संबंध नव्हता. त्या हल्ल्याचे भांडवल करण्याचे केसरकरांनी थांबवावे, असे माजी नगरसेवक उमेश कोरगावकर यांनी स्पष्ट केले.
येथील पर्णकुटी विश्रामगृहावर उमेश कोरगावकर यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी कोरगावकर म्हणाले, गेली दोन वर्षे दीपक केसरकर यांनी नाव न घेता या हल्ल्याबाबत अनेकवेळा भाषणातून उल्लेख केला आहे. शिवसेना प्रवेशावेळीही त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केला. माझ्यावरील हल्ल्याचे केसरकरांनी भांडवल करू नये. अन्यथा शिवसेनेविरोधात काढलेल्या उद्गारांची अनेक कात्रणे असून ती बाहेर काढावी लागतील, असा इशाराही कोरगावकर यांनी आमदार केसरकरांना दिला.
यामुळे मला मानसिक त्रास होत असून यापुढे माझ्यावरील हल्ल्याबाबत कुठेही काही बोलल्यास त्यांचे वस्त्रहरण करण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असे कोरगावकर यांनी सांंगितले. दीपक केसरकर नगराध्यक्ष असताना काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या श्रीमुखात भडकाविले होते. या रागाने केसरकरांनी त्या कार्यकर्त्यांच्या घरात गुंड पाठविले होते. तेव्हा केसरकरांना दहशत समजली नाही का, असा सवाल कोरगावकर यांनी उपस्थित केला. राजकीय हल्ल्यानंतर सहा महिने अंथरुणात असताना केसरकरांनी साधी विचारपूसही केली नव्हती. मात्र, उध्दव ठाकरे मुंबईत अॅडमिट असताना भेटावयास आले होते. त्यामुळे शिवसेनेबाबतचा आदर माझ्या मनात कायमच राहील. माझ्यावरील राजकीय हल्ला हा काही गैरसमजातून झाला होता. यात राणेंचा कोणताही संबंध नव्हता, असे कोरगावकर यांनी सांगत केसरकरांनी माझ्यावरील हल्ल्याचे भांडवल करणे थांबवावे, असेही उमेश कोरगावकर यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)