विकासाआड येणाऱ्यांचा मुलाहिजा नको : वायकर
By Admin | Updated: February 26, 2015 00:10 IST2015-02-25T22:57:05+5:302015-02-26T00:10:27+5:30
पालकमंत्र्यांनी आपण प्राँटिंग करु नका, सभागृहात येऊन बोला, आपण शाखाप्रमुख असलात तरी नियम सर्वांनाच सारखे असे सुनावले.

विकासाआड येणाऱ्यांचा मुलाहिजा नको : वायकर
चिपळूण : विकासकामात कोणत्याही सरपंचाने किंवा गावपुढाऱ्याने, त्याच्या नातेवाईकाने आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करुन सर्वसामान्य माणसाला न्याय द्या. विकासापासून कोणालाही वंचित ठेवू नका, असे आदेश पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिले. चिपळूण पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी सभागृहात पालकमंत्री वायकर यांनी आपला पहिला जनता दरबार घेतला. यावेळी आमदार सदानंद चव्हाण, उपविभागीय अधिकारी रवींद्र हजारे, तहसीलदार वृषाली पाटील, सभापती समिक्षा बागवे, गटविकास अधिकारी गणेश पिंपळे, माजी आमदार सूर्यकांत दळवी, जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख सुधीर शिंदे यांच्यासह सर्व पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य, विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. या जनता दरबाराला तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री वायकर यांनी आपल्या पहिल्याच जनता दरबारात नागरिकांच्या विविध प्रश्नांना सडेतोड व समाधानकारक उत्तरे देऊन उपस्थितांची मने जिंकली.
या जनता दरबारात रस्ते, पाणी, गटारे, संरक्षण भिंत, नाले, वीज या प्रश्नांबरोबर भूमि अभिलेख व महसूल खात्याच्या अखत्यारितील काही प्रश्नांचा समावेश होता. प्रत्येक प्रश्नावर मंत्री वायकर यांनी अधिकाऱ्यांकडून उत्तरे मागून घेतली आणि समोरच्याचे समाधान केले. जेथे चूक आढळली त्याची माहिती घेऊन त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता जनतेच्या हितासाठी आपण कार्यरत राहणार असल्याची चुणूक त्यांनी यावेळी दाखवली. त्यामुळे विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांचे कौतुक केले. पालकमंत्री म्हणून आपण प्रथम या जिल्ह्यातील कामाला प्राधान्य देणार आहोत. कोयनेचे अवजल मुंबईला नेताना स्थानिकांवर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे हे त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री म्हणून टपरीसारखे प्रश्न आपल्याकडे नकोत एवढा दर्जा घसरवू नका. एखादे कन्स्ट्रक्टिव्ह काम असायला हवे असेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन विनोदकुमार शिंदे यांनी केले. (प्रतिनिधी)
माजी सभापती रामदास राणे हे गणेशखिंड, भोम, मालदोली रस्त्याबाबत बोलत असताना अधिकाऱ्यांनी चुकीचे उत्तर दिले. यावेळी सभागृहाबाहेर असलेले दोणवलीचे माजी शाखाप्रमुख प्रकाश चव्हाण यांनी अधिकारी खोटं बोलतात असे सांगितले. यावर पालकमंत्र्यांनी आपण प्राँटिंग करु नका, सभागृहात येऊन बोला, आपण शाखाप्रमुख असलात तरी नियम सर्वांनाच सारखे असे सुनावले. याच विषयात राणे यांनी आमदार चव्हाण यांचे गाव याच भागात आहे असे सांगताच चव्हाण यांनी नाही म्हटले. यावर पालकमंत्र्यांनी कोटी केली. मात्र, या रस्त्याबाबत गांभीर्याने दखल घेण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.