‘मिशन’ म्हणून काम करा
By Admin | Updated: October 6, 2015 23:46 IST2015-10-06T21:56:14+5:302015-10-06T23:46:05+5:30
संदेश कोंडविलकर : चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेस मेळावा

‘मिशन’ म्हणून काम करा
चिपळूण : आता नगर परिषद व त्या नंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका येणार आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वत: निवडून येताना आपल्या सहकाऱ्यांनाही निवडून आणण्याचा प्रयत्न करावा. सेना - भाजपमध्ये वाद आहेत. ते एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. उपाशी भाजपवाल्यांना खाण्याशिवाय काही दिसत नाही. त्यांनी दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही. निवडणूक कार्यक्रम मिशन म्हणून पूर्ण करा, असे आवाहन निरीक्षक संदेश कोंडविलकर यांनी केले.
चिपळूण येथे राधाताई लाड सभागृहात सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा व गणेश सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ झाला. यावेळी पक्ष निरीक्षक कोंडविलकर, प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार रमेश कदम, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, उपाध्यक्ष पद्माकर आरेकर, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, सभापती समीक्षा बागवे, पंचायत समिती सदस्या स्नेहा मेस्त्री, महिलाध्यक्षा चित्रा चव्हाण, विधानसभा क्षेत्राध्यक्ष दादा साळवी, शहराध्यक्ष श्रीकृष्ण खेडेकर आदी उपस्थित होते. तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी त्यांचे स्वागत केले.
गणेशोत्सव काळात घेतलेल्या गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यानुसार प्रथम पारितोषिक श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूण, द्वितीय क्रमांक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बहाद्दूरशेख नाका, तृतीय क्रमांक महर्षी अण्णासाहेब कर्वे मंडई, चिपळूण तर उत्तेजनार्थ पोफळी गणेशोत्सव मंडळ व नवतरुण मित्र मंडळ, खेर्डी यांना गौरविण्यात आले.
प्रदेश उपाध्यक्ष कदम यांनी आपण पालिकेकडे लक्ष दिले असून, पालिकेचा हागणदारीमुक्त म्हणून गौरव झाला आहे. हे यश सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे असल्याने कर्मचाऱ्यांचाही गौरव व्हायला हवा, असे सांगितले. तर जिल्हाध्यक्ष निकम यांनी सांगितले की, शहरात राष्ट्रवादीची ताकद वाढणे गरजेचे आहे. विधानसभेला आपल्याला १० हजार मतांची आघाडी शहरातून अपेक्षित होती पण प्रत्यक्षात ३५०० मतांचीच आघाडी मिळाली हे चित्र बदलणे गरजेचे आहे. सुनील तटकरे, निरंजन डावखरे यांनीही फारसा संपर्क ठेवला नाही. त्यामुळे आता अधिक जोमाने काम करा, असे सांगितले. (प्रतिनिधी)
रिकाम्या खुर्च्यांनी लक्ष वेधले
राष्ट्रवादीच्या आजच्या या मेळाव्याबाबत कार्यकर्ते व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये उदासिनता जाणवली. राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या या तालुक्यात केवळ दीड - दोनशे कार्यकर्तेच उपस्थित होते. रिकाम्या खुर्च्यांची संख्या उपस्थितांचे लक्ष वेधत होती.माजी आमदार रमेश कदम यांनी ग्रामीण भागात नियोजन नसल्याचे सांगून येताना प्रत्येक कार्यकर्त्याने १० ते १५ अन्य सहकाऱ्यांना आणायला हवे होते असे सुचवून आपल्याच पदाधिकाऱ्यांना चिमटा काढला. यातून मेळावा फसल्याचेच त्यांनी सूचित केले.