जिल्ह्यात एस. टी.साठी ४४० नवीन चालकांची नियुक्ती
By Admin | Updated: February 1, 2015 00:47 IST2015-02-01T00:47:50+5:302015-02-01T00:47:50+5:30
कैलास देशमुख : देवरुख बसस्थानकाचे काम महिनाभरात पूर्ण होणार

जिल्ह्यात एस. टी.साठी ४४० नवीन चालकांची नियुक्ती
देवरुख : नेहमी होणाऱ्या मागणीची दखल एस. टी. महामंडळाने घेतली असून, जिल्ह्याला ४४० चालक मिळाल्याचे सांगून, यातील २८० चालकांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन ते सेवेमध्ये रुजू झाले आहेत. तर १६० चालक नियुक्तीच्या प्रतिक्षा यादीवर असल्याची माहिती, एस. टी.चे जिल्हा नियंत्रक कैलास देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, देवरुख बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सध्या शेवटच्या टप्प्यात आले असून, तात्पुरत्या स्वरुपासाठीच बसस्थानकाचे स्थलांतर करण्यात आले आहे. बसस्थानकातील काँक्रीटीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु असून, येत्या २५ फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्णत्त्वास जाणार आहे. त्यानंतर, सुसज्ज व अद्ययावत असे देवरुख बसस्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी खुले होणार आहे. देवरुख बसस्थनकाच्या नूतनीकरणाच्या कामाच्या पाहणीसाठी आले असता, ते बोलत होते. गेल्या तीन वर्षांपासून चालू असलेल्या बसस्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामाला एस.टी. स्टँड कँटीनच्या इमारतीमुळे विलंब लागल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, २५ जानेवारीपासून येथील बसस्थानकाचे तात्पुरत्या वेळेसाठी स्थलांतर केले आहे. २५ जानेवारीपासून बरोबर एक महिन्याच्या कालावधीत बसस्थानकाचे उर्वरित काम पूर्णत्त्वास जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
ते म्हणाले की, देवरुखचा आगार महिनाभरात प्रवाशांच्या सेवेसाठी खुला करण्यात येणार आहे. मात्र, देवरूखचा आगार हा शहापूर ते बांदा येथील या पट्ट्यांमधील आगारापेक्षा सुसज्ज, अद्ययावत आणि देखणा असा २५ फेब्रुवारीनंतर पहावयास मिळणार आहे. यावेळी, विश्ोष बाब नमूद करताना ते म्हणाले की, नेहमी होणाऱ्या मागणीची दखल एस.टी. महामंडळाने घेतली असून, जिल्ह्याला ४४० चालक मिळाल्याचे सांगून यातील २८० चालकांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन ते सेवेमध्ये रुजू झाले आहेत. १६० चालक प्रतिक्षा यादीवर असल्याचेही त्यांनी सांगितले. देवरुख आगाराला प्रशिक्षित २८ चालकांसोबत, १ सहाय्यक वाहतूक प्रशिक्षक आणि ७ कार्यशाळा कर्मचारी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)