गावांचा विकास आराखडा तयार करावा : जिल्हाधिकारी
By Admin | Updated: May 21, 2015 00:07 IST2015-05-20T22:07:38+5:302015-05-21T00:07:02+5:30
योजनांची राबवत असताना आखून देण्यात आलेल्या वेळापत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, त्यादृष्टीने विकास आराखडा तयार करावा,

गावांचा विकास आराखडा तयार करावा : जिल्हाधिकारी
रत्नागिरी : केंद्र शासनाच्या संसद आदर्श ग्राम योजनेच्या माध्यमातून सहभागी गावांचा कायापालट करण्याची संधी प्राप्त झाली आहे. विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून आदर्श गाव साकार होऊ शकेल. गावाचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून सर्व विभागप्रमुखांनी या गावांचा ग्राम विकास आराखडा तयार करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत ग्रामविकास आराखडा तयार करण्यासाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना राधाकृष्णन म्हणाले, संसद आदर्श ग्राम योजना ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. योजनेच्या माध्यमातून गावांच्या भौतिक प्रगतीबरोबरच आर्थिक उन्नती साधायची आहे. त्यादृष्टीने योजनेत नमूद केलेल्या विकासाच्या मुद्द्यांनुसार अंमलबजावणी कार्यक्रमाची आखणी करावी आणि गावांमध्ये विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सर्व विभागांनी विशेष प्रयत्न करावेत. योजनांची राबवत असताना आखून देण्यात आलेल्या वेळापत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, त्यादृष्टीने विकास आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले.यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी विद्या मोरबाळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. विवेक पनवेलकर, महिला बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे. एस. शेख, समाजल्याण विभागाचे सहायक आयुक्त अर्जुन बन्ने, यशदा, पुणेच्या प्रशिक्षिका सुरेखा जोशी यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी योजनेचा आराखडा तयार करण्याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)