जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांत आज राष्ट्रीय अदालती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:28 IST2021-08-01T04:28:57+5:302021-08-01T04:28:57+5:30
रत्नागिरी : लाॅकडाऊनमुळे प्रलंबित राहिलेल्या न्यायालयीन प्रलंबित, तसेच वादपूर्व प्रकरणांमध्ये झटपट न्यायालयीन निर्णय व्हावेत, या उद्देशाने येथील जिल्हा ...

जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांत आज राष्ट्रीय अदालती
रत्नागिरी : लाॅकडाऊनमुळे प्रलंबित राहिलेल्या न्यायालयीन प्रलंबित, तसेच वादपूर्व प्रकरणांमध्ये झटपट न्यायालयीन निर्णय व्हावेत, या उद्देशाने येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने रविवार, १ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रीय लोकअदालत आयोजित केली आहे. रत्नागिरीच्या जिल्हा न्यायालयात तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये या लोकअदालती होणार आहेत.
दिल्ली राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण आणि मुंबईतील राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या सूचनेनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे ही राष्ट्रीय लोकअदालत आयोजित केली आहे. कोरोना महामारीमुळे अनेक महिने न्यायालयांना पक्षकार, वकील यांच्या उपस्थित कामकाज करणे शक्य झाले नाही. त्यामुळे या राष्ट्रीय अदालती आयोजित करण्यात आल्या असून, याद्वारे अनेक प्रकरणांचा निर्णय केला जाणार आहे.
व्हाॅट्सॲप अथवा ई-मेल सुविधा उपलब्ध असलेलेे नागरिक आणि दोन्ही पक्षकारांकडे उपलब्ध असेल तर त्यांना लोकअदालतमध्ये ऑनलाइन सहभागी होता येणार आहे, त्यामुळे वकील आणि पक्षकार यांनी आपले व्हाॅट्सॲप क्रमांक आणि ई-मेल ॲड्रेस संबंधित न्यायालय, बँका, पतसंस्था, शासकीय कंपन्या, स्थानिक स्वराज्य संस्था यांना उपलब्ध करून दिल्यास गर्दीवर नियंत्रण ठेवता येणार आहे.
दिवाणी आणि अदखलपात्र गुन्ह्यांच्या बाबतीत, तसेच तंटामुक्ती समितीसमोर वाद मिटला असल्यास त्याबाबत निवाडा घेण्यासाठी लोकांनी आणि पक्षकारांनी पुढे यावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. क्यू. एस. एम. शेख व वरिष्ठ न्यायाधीश तथा प्राधिकरणाचे सचिव आनंद सामंत यांनी केले आहे.