जिल्हाधिकारी-आमदारांनी घेतली शाळा
By Admin | Updated: July 21, 2016 22:08 IST2016-07-21T22:00:34+5:302016-07-21T22:08:28+5:30
एक दिवस शाळेसाठी.. : उदय सामंत गुरुजींनी निवळी तिठा केंद्रशाळेत घेतला तास
जिल्हाधिकारी-आमदारांनी घेतली शाळा
रत्नागिरी : निवळी तिठा, रावणंगवाडी येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत गुरुवारी दुपारी आमदार उदय सामंत गुरुजींचा तास झाला. पत्रकारांनीही गुरुजींची भूमिका बजावत तास घेतला. या तासात केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांमधील ‘टॅलेंट’ दिसून आले. अध्यापनाचा दर्जा पाहूून आमदार सामंतही सुखावले.
निवळी तिठा केंद्रशाळेच्या दर्जाबाबत, पोषण आहाराबाबतची ही चांगली स्थिती मी अधिवेशनातही मांडणार आहे. या शाळेला कमी पडणाऱ्या वर्गखोल्यांचा प्रश्न सोडविण्याची ग्वाही देतानाच ‘निवळी शाळा पॅटर्न’ तालुक्यातील सर्वच शाळांनी राबवावा, असे आवाहन आमदार सामंत यांनी यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना केले.
‘एक दिवस शाळेसाठी’ देण्याच्या शासनाच्या धोरणानुसार निवळी तिठा केंद्रशाळेत आमदार सामंत व प्रभारी गटशिक्षणाधिकारी डी. बी. सोपनूर, शिक्षण विस्तार अधिकारी भाग्यश्री हिरवे यांनी सहकाऱ्यांसोबत गुरूवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत शाळेतील शिक्षक, विद्यार्थी तसेच त्यांचे पालक यांच्या समस्यांची माहिती घेतली. शिक्षक कशाप्रकारे अध्यापन करतात, याचाही अनुभव घेतला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रध्दा पाटील यांनी हा उपक्रम शाळेत राबविण्यात येत असल्याबाबत आपल्या प्रास्ताविकात आमदार सामंत व गटशिक्षणाधिकारी डी. बी. सोपनूर, विस्तार अधिकारी भाग्यश्री हिरवे यांना धन्यवाद दिले. आमदार सामंत यांनी स्वत: ७ वीच्या वर्गाचा तास घेतला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना विधानसभेच्या कामकाजाची माहिती दिली. मात्र, यावेळी विद्यार्थ्यांना विधानसभा कामकाजाची बहुतांश माहिती असल्याचेही त्यांच्या लक्षात आले.
निवळी तिठा शाळेतील शिक्षणाचा दर्जा खूपच चांगला आहे. १ ते ७ पर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत १८८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मराठी माध्यमाची शाळा असूनही येथील विध्यार्थ्यांची इंग्रजी विषयात चांगली प्रगती असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. त्यांना विचारलेल्या काही प्रश्नांना अचूक उत्तरेही मिळाली. शाळेच्या जडणघडणीमध्ये पालकांचा, शिक्षकांचा समन्वय असल्यानेच या शाळेने शैक्षणिक दर्जाचा आलेख उंचावता ठेवला आहे, असे सामंत म्हणाले. (प्रतिनिधी)
असा झाला तास
आमदार सामंत यांनी ७ वीचा तास घेतला. त्यात चित्रकलेत प्रवीण विद्यार्थ्यांकडून फळ्यावर काही चित्रही काढून घेण्यात आली. त्या मुलांचे कौतुक करण्यात आले. अन्य वर्गांमध्ये पत्रकारांनी तास घेतले. त्यावेळी २ ते २० पर्यंत पाढे पाठ असल्याच्या चाचणीतही मुले उत्तीर्ण झाली. विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात कोण व्हायचे आहे, यावर चालक, पोलीस, नर्स, नृत्यकार, पोलीस निरीक्षक, अभियंता, डॉक्टर यासारखी उत्तरे मिळाली. त्यातील मुलांच्या घरात त्याच व्यवसायात, नोकरीत कोणी ना कोणी कार्यरत असल्याचे व त्याचे प्रतिबिंब त्यांच्या भावी स्वप्नात पडल्याचेही दिसून आले. मराठी विषयातील कविता चांगल्या चालीवर पाठ असल्याने त्याही मुलांनी म्हणून दाखविल्या. कवितेचे कवी कोण? या प्रश्नाचे उत्तरही मुलांकडूून मिळाले. सर्वच प्रश्नांची तत्परतेने उत्तरे मिळाल्याने या मुलांचे सामान्यज्ञानही चांगले असल्याचे दिसून आले.
शाळा दोन मजली होणार?
निवळी तिठा शाळेत मुलांना २ वर्गखोल्यांची कमतरता असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पालीतील शाळेच्या धर्तीवर येथेही तळमजला व त्यावर आणखी एक मजला अशी शाळा इमारत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार सामंत म्हणाले. येथील पोषण आहाराचा आस्वाद सर्वांनीच घेतल्यानंतर असाच दर्जेदार पोषण आहार अन्य शाळांमध्येही विद्यार्थ्यांना दिला जावा. त्याबाबत अधिकाऱ्यांनी वारंवार पाहणी करावी, असेही सामंत म्हणाले.
जिल्हाधिकारी विद्यार्थ्यांमध्ये रमले
रत्नागिरी : विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी ‘एक दिवस शाळेसाठी’ या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी आज (गुरूवारी) भोके मठ येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला भेट दिली. या मुलांची कृतीशिलता पाहताना ते त्यांच्यात इतके रममाण झाले की, जिल्हाधिकारी म्हणून मुलांच्या मनातील असलेली भीतीही कुठल्या कुठे पळाली.
‘एक दिवस शाळेसाठी’ या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी दुसऱ्या टप्प्यात तालुक्यातील भोके - मठ येथील पहिली ते चौथी इयत्ता असलेल्या प्राथमिक मराठी शाळेला भेट दिली. सकाळी अगदी परिपाठाच्या वेळेच्या आधी प्रदीप पी. भोके मठ शाळेत उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण परिपाठ पाहिला. यानंतर त्यांनी प्रत्येक विषयासंदर्भात प्रत्येक विद्यार्थ्याचा दर्जा पाहिला. मुलं संगणकावर कशी काम करतात?, कशी शिकतात, याचे निरीक्षण केले.
पूर्ण दिवस या बालकांमध्ये व्यतीत करताना प्रदीप पी. त्यांच्यात रममाण झाले होते. त्यामुळे ही मुलेही त्यांच्याबरोबर निर्भयपणे वावरत होती. एका विद्यार्थिनीची बुद्धिमत्ता पाहून त्यांनी तिला पेन बक्षीस दिले. तसेच सर्व मुलांना चॉकलेट दिले. त्यांच्यासमवेत त्यांनी शालेय पोषण आहारही घेतला. या मुलांचे कौतुक करतानाच त्यांनी या मुलांच्या हुशारीची दखल घेत त्यांना अत्युच्च दर्जाचा शेरा दिला. यावेळी उपस्थित करबुडे केंद्राचे प्रमुख विजय कांबळे, मुख्याध्यापिका मानसी गवंडे, तसेच सहशिक्षिका नेहा अवसरे यांच्याशीही त्यांनी चर्चा केली.
यावेळी त्यांनी उपस्थित ग्रामस्थांसोबत जवळच्या धरणाची पाहणी केली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी केंद्रप्रमुख कांबळे यांना ज्या शाळा प्रगतीत मागे आहेत. त्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना मार्गदर्शन करा, अशी सूचना केली त्यानुसार येत्या शनिवारी या शिक्षकांसाठी करबुडे केंद्रशाळेत कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून, स्वत: जिल्हाधिकारी प्रदीप पी. या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. (प्रतिनिधी)