जिल्हा प्रशासनाने लसींचा साठा जाहीर करावा : नीलेश राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:31 IST2021-05-13T04:31:56+5:302021-05-13T04:31:56+5:30
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने लसीकरणासाठी जिल्ह्याला नेमक्या किती लसी प्राप्त झाल्या, किती साठा उपलब्ध आहे, हे जाहीर करायला ...

जिल्हा प्रशासनाने लसींचा साठा जाहीर करावा : नीलेश राणे
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने लसीकरणासाठी जिल्ह्याला नेमक्या किती लसी प्राप्त झाल्या, किती साठा उपलब्ध आहे, हे जाहीर करायला हवे. लसीकरणाबाबत प्रशासनाने पारदर्शक पद्धतीने काम करावे, जेणेकरून लोकांचे जीव धोक्यात न टाकता होत असलेली गैरसोय टाळता येईल, अशी स्पष्ट मागणी माजी खासदार तथा भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला कोरोनाने विळखा घातला असतानाच लसीकरणाचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. मिस्त्री हायस्कूलमध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणावेळी झालेली चेंगराचेंगरी आणि जिल्हा प्रशासनाचे कुचकामी ठरलेले नियोजन समोर आल्यानंतर नीलेश राणे यांनी ही प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली आहे.
जिल्हा प्रशासनाने या सर्व मोहिमेत जर पारदर्शकता ठेवली असती तर लोकांचे जीव धोक्यात आले नसते, असेही ते म्हणाले. जिल्ह्यात लसीकरणाची नोंदणी करण्यासाठी दिलेली लिंक उघडताक्षणी नोंदणी पूर्ण झाल्याचे दिसते. लसी उपलब्ध असतील तर मग सलग लसीकरण का घेतले जात नाही? त्यामुळे यात कुठेतरी पाणी मुरत असल्याचा संशय बळावतो आहे. याबाबत असंख्य नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. अशावेळी जिल्हा प्रशासनाने पारदर्शकता ठेवून रत्नागिरी जिल्ह्यासाठी कोणत्या प्रकारच्या किती लसी शासनाकडून प्राप्त झाल्या. तालुक्यांमध्ये किती वाटप करण्यात आले, किती साठा उपलब्ध आहे, तसेच किती नागरिकांना लसी देण्यात आल्या, याची माहिती जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.