कोरोना युद्धासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:31 IST2021-04-25T04:31:08+5:302021-04-25T04:31:08+5:30

जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी सध्या मुबलक प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा करणे गरजेचे असल्याने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी ...

District administration ready for Corona War | कोरोना युद्धासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

कोरोना युद्धासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी सध्या मुबलक प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा करणे गरजेचे असल्याने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या प्रयत्नाने जिल्हा शासकीय रुग्णालयात १ कोटीच्या निधीतून १ कोटी खर्चातून १७० जम्बो सिलिंडरची क्षमता असलेल्या ऑक्सिजन प्लांटची उभारणी झाली आहे. जिल्हा महिला रुग्णालयात सध्या प्रक्रिया सुरू आहे. लवकरच खेड तालुक्यातील कळंबणी, दापोली आणि चिपळूण तालुक्यातील कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात प्लांट उभारण्यास सुरुवात होईल.

जादा ऑक्सिजन बेड वाढविण्यारही भर देण्यात आला आहे. सद्य:स्थितीत महिला रुग्णालयात ९९ टक्के, तर जिल्हा रुग्णालयात ८० टक्के ऑक्सिजन बेड असून, जिल्ह्यात सुमारे ८०० च्या आसपास बेड उपलब्ध आहेत. ११७ व्हेंटिलेटर्स ऑक्सिजन बेड आहेत. जिल्ह्यात इतरही कोविड रुग्णालयात ऑक्सिजन बेड वाढविण्यात येणार आहेत. यासाठी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे आणि निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांचेही सर्व परिस्थतीवर लक्ष असून, एकंदरीत हे सर्वच अधिकारी रात्रं-दिवस एकमेकांशी समन्वय साधून आपत्कालीन परिस्थिती हाताळत आहेत.

हे करतानाच रुग्णांच्या उपचारांवरही लक्ष ठेवून आहेत. खासगी कोरोना रुग्णालयांकडून जादा दराने उपचारांची आकारणी होत नाही ना, तसेच रेमडेसिविरच्या किमतीत काळाबाजार होत नाही ना, पेड सीसीसी रुग्णांकडून अधिक दर आकारत नाहीत ना, या सर्व बाबींवर बारकाईने जिल्हा प्रशासनाच्या सर्व यंत्रणांचे लक्ष आहे.

त्याचबरोबर सध्या लसीकरण आणि कोरोना चाचण्या वाढल्या असल्याने आरोग्य यंत्रणेवर अधिक ताण येत आहे. नागरिकांची दोन्हीसाठी गर्दी वाढली आहे. त्यामुळे आता चाचण्यांची केंद्रे वाढवितानाच लसीकरणाचीही केंद्रे वाढविण्यात आली आहेत. त्यासाठी योग्य नियाेजनही करण्यात आले आहे.

हेल्पिंग हँडस्‌ची मदत

आरोग्य यंत्रणेचे अपुरे मनुष्यबळ लक्षात घेऊन सध्या विविध सामाजिक संस्थांच्या हेल्पिंग हँडस्‌ या फोरमचे सहकार्य जिल्हा प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर होत आहे. रुग्णालयात असलेल्या रुग्णांना दाखल करण्यासाठी नातेवाइकांना मदत करणे, नातेवाइकांना इतर बाबींसाठी मदत करणे, लसीकरण, तसेच चाचण्यांच्या ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणेसोबत राहून मदत करणे आदी सर्व प्रकारचे सहकार्य हे स्वयंसेवक मोठ्या प्रमाणावर दिवस-रात्र विना मोबदला करीत आहेत.

डाॅक्टरांच्या भरतीला प्राधान्य

जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांत डॉक्टरांची कमतरता असल्याने सध्या भरती प्रक्रियेकडे अधिक लक्ष देण्यात आले आहे. गृहविलगीकरणात राहणाऱ्या रुग्णांसाठी ४ डाॅक्टर्स आणि ३ किंवा ४ परिचारिकांचे ‘टेलिफोनिक’ पथक तयार करण्यात येणार असून, हे पथक गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना मार्गदर्शन करणार आहे. सध्या खासगी डॉक्टरांचेही सहकार्य घेतले जात आहे.

कोटसाठी (फोटो घेणे)

परिस्थिती गंभीर; नियम पाळल्यास कोरोनावर यश नक्कीच

सध्याच्या कोरोना लढ्यात सर्वच ठिकाणी डाॅक्टर आणि अन्य आरोग्य कर्मचारी चांगले काम करीत आहेत. काही गडबड असेल तर ती सुधारली जाईल. सध्या परिस्थिती गंभीर आहे. मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. बालके, तरुणांमध्येही संसर्ग वाढतोय. परिस्थिती गंभीर आहे. मात्र, प्रशासनही कोरोना लढ्यासाठी सज्ज आहे. कोरोनाचे नियम पाळल्यास कोरोना नक्कीच हद्दपार होईल. म्हणून नागरिकांनी घरीच राहावे. कोरोनाच्या अनुषंगाने योग्य ती खबरदारी घ्यावी. घाबरू नका; पण खबरदारी घ्या.

- लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी, रत्नागिरी

Web Title: District administration ready for Corona War

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.