जिल्ह्यात ५१ शाळा निर्लेखन प्रतीक्षेत

By Admin | Updated: August 22, 2014 01:07 IST2014-08-22T00:59:33+5:302014-08-22T01:07:13+5:30

जिल्हा परिषद : प्राथमिक शाळांच्या इमारती धोकादायक

In the district 51 schools waiting for authorization | जिल्ह्यात ५१ शाळा निर्लेखन प्रतीक्षेत

जिल्ह्यात ५१ शाळा निर्लेखन प्रतीक्षेत

रत्नागिरी : ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या ५१ प्राथमिक शाळांच्या इमारतींची पडझड झाली असून, त्या धोकादायक स्थितीत आहेत. या सर्व शाळा निर्लेखनाच्या प्रतीक्षेत आहेत.
शासनाकडून शैक्षणिक प्रगतीवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. मात्र, पडझड झालेल्या धोकादायक स्थितीत असलेल्या शाळा इमारतींच्या बांधकामासाठी जिल्हा परिषदेकडे वेळीच निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे आजही धोकादायक स्थितीत असलेल्या शाळांच्या इमारतींचे निर्लेखन करुन ठेवण्यात येते.
धोकादायक स्थितीत असलेल्या शाळांच्या इमारतींच्या जागी नवीन शाळांचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी ग्रामीण भागातून जोर धरत आहे. मोडकळीस आलेल्या शाळांमुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी धोकादायक स्थितीत असलेल्या शाळांच्या इमारती पाडून त्या जागी नवीन शाळा बांधणे आवश्यक असल्याचे म्हटले जात आहे.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे धोकादायक स्थितीत असलेल्या प्राथमिक शाळांचे ५१ प्रस्ताव आले होते. या शाळांची पाहणी केल्यानंतर त्यांचे निर्लेखन करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यातील १६ शाळांच्या इमारतींचे प्रस्ताव निर्लेखनासाठी मंजूर करण्यात आले आहेत, तर ८ शाळांचे प्रस्ताव उपअभियंत्यांकडे प्रलंबित आहेत. शिवाय १३ प्राथमिक शाळांचे प्रस्ताव अपूर्ण असल्याने ते शिक्षण विभागाकडे प्रलंबित आहेत.
१४ शाळांच्या इमारतींचे प्रस्ताव निर्लेखनासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे सादर करण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच या शाळांचे निर्लेखन करणे आवश्यक आहे. मात्र, बांधकाम विभाग गांभीर्याने घेत नसल्याची ओरड जिल्हा परिषद सदस्यांमध्ये सुरु आहे. त्यामुळे या शाळांचे निर्लेखन कधी होणार? हा प्रश्न आहे. (प्रतिनिधी)

Web Title: In the district 51 schools waiting for authorization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.