जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST2021-06-30T04:20:30+5:302021-06-30T04:20:30+5:30
चिपळूण : उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांच्या सहकार्याने आणि रोहिदास समाज सेवा संघ, तालुका खेडचे उपाध्यक्ष संतोष सावर्डेकर यांच्या पुढाकाराने ...

जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
चिपळूण : उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांच्या सहकार्याने आणि रोहिदास समाज सेवा संघ, तालुका खेडचे उपाध्यक्ष संतोष सावर्डेकर यांच्या पुढाकाराने आंबडस रोहिदासवाडीमधील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप नुकतेच करण्यात आले. यावेळी रोहिदास समाज सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
रॅपलिंगचे प्रशिक्षण
शिरगाव : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणाऱ्या कुंभार्ली घाटात अलोरे शिरगाव (चिपळूण) पोलीस यांना टीजब्ल्यूजे डीमने रॅपलिंगचे प्रशिक्षण दिले. यावेळी पोलिसांनी प्रथमच २०० फूट खोल दरीत रॅपलिंग करण्याचा थरारक अनुभव घेतला. नागमोडी असलेल्या या घाटात सतत वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे अपघात घडतात.
रस्त्याचे नूतनीकरण
सावर्डे : खेरशेत कासे, पेढांबे या रस्त्यासाठी दोन कोटी ७७ लाख रुपयांचा निधी सरकारने मंजूर केला आहे. अद्ययावत साईडपट्ट्या, गटारे, वळण कमी करणे तसेच काही पुलांचे नूतनीकरण यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला असून, पावसाळ्यानंतर या कामांना प्रारंभ होणार आहे.
रुंदीकरणाची मागणी
आवाशी : खेड तालुक्यातील कळंबणी ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील कळंबणी खरवते परिसरात असणाऱ्या वाहतूक बेटाच्या रुंदीकरणाची गरज व्यक्त होत आहे. या मार्गाचे रुंदीकरण झाल्यास येथील बसस्थानकातून सोडण्यात येणारी खेड-वडगाव एस.टी. विद्यार्थ्यांसाठी व्हाया बीरमणी करणे सोपी होणार आहे.
पाणीसाठ्यात वाढ
रत्नागिरी : गेल्या आठवड्यात संततधारेने झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात विक्रमी वाढ झाली आहे. ३० धरणांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला असून, उर्वरित १६ धरणांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी भरले आहे. सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे.
शेतकऱ्यांना रोपांचे वाटप
रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या कुटुंबात जिथे मुलीचा जन्म झाला आहे, अशा शेतकऱ्यांना कन्या वनसमृद्धी योजनेंतर्गत रोपांचे वाटप करण्यात येणार आहे. १ जुलैपासून ही योजना राबविली जाणार आहे. ७० लाभार्थ्यांचा या योजनेचा लाभ घेण्याचे उद्दिष्ट या विभागाने निश्चित केले आहे.
मोफत वृक्षवाटप
देवरुख : पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्षलागवडीचे महत्त्व समोर ठेवून राज्यात वृक्षसंवर्धन मोहीम राबविली जाते. या मोहिमेंतर्गत तालुक्यातील ग्रामपंचायत पांगरीतर्फे मोफत वृक्षलागवडीवर भर देण्यात येणार आहे. नवीन लागवडीसाठी शेतकऱ्यांना लागणाऱ्या रोपांची गरज लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने सामाजिक वनीकरण विभागाकडे या रोपांची मागणी केली आहे.
जाधव यांचा सन्मान
खेड : काव्य, चारोळी समूहाच्या वतीने युवा साहित्यिक सुदर्शन जाधव यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे कार्य सुरू आहे. लेखणीतून त्यांची अनेक काव्ये साकार झाली आहेत. त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
पावसाच्या हलक्या सरी
राजापूर : सध्या पावसाचा जोर खूपसा कमी झाला आहे. हलक्या सरी वगळता आता सूर्यदर्शनही होऊ लागले आहे. रात्रीही आता पावसाचा जोर कमी झाला आहे. तुरळक सरींवर पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे काही ठिकाणी लावणीची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे शेतकरी आता पुन्हा पावसाची प्रतीक्षा करू लागले आहेत.
शाळेत लागवड
दापोली : येथील राजे स्पोर्टस अकॅडमीच्या माध्यमातून आगरवायंगणी पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी आगरवायंगणी केंद्र शाळेच्या परिसरात फुलझाडांची लागवड केली. यावेळी अकादमीचे प्रशिक्षक संदेश चव्हाण, खजिनदार सुदेश चव्हाण तसेच अन्य विद्यार्थी उपस्थित होते.