आरोग्य साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:33 IST2021-05-27T04:33:28+5:302021-05-27T04:33:28+5:30

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील अंत्रवली मालपवाडी गावातील ग्रामस्थांना आरोग्यविषयक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले. वाफेचे मशीन, स्टीमरमधील गोळ्या व ...

Distribution of health materials | आरोग्य साहित्य वाटप

आरोग्य साहित्य वाटप

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील अंत्रवली मालपवाडी गावातील ग्रामस्थांना आरोग्यविषयक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले. वाफेचे मशीन, स्टीमरमधील गोळ्या व सॅनिटायझर देण्यात आले. दिवंगत समाजसेवक फिरोज असगरअली कोठालिया यांच्या स्मरणार्थ सामाजिक कार्यकर्ते दिनकर पाटील व राकेश मीन यांच्याकडून मदत करण्यात आली.

वसतिगृह प्रवेश

चिपळूण : तालुक्यातील डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान, मार्गताम्हाणे संस्थेच्या देखरेखीखाली येथील (कै.) प्रेमजीभाई आसर छात्रालयात प्रवेश देण्यात येणार आहे. मागासवर्गीय वसतिगृहात शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आठवी ते १०वीपर्यंतच्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे.

पाणीटंचाई

खेड : तालुक्यातील वावेतर्फे नातू धनगरवाडी येथे पाण्याची टंचाई जाणवत असून ग्रामस्थांना वणवण करावी लागत आहे. धनगरवाडीतर्फे पंचायत समितीकडे टँकरची मागणी करण्यात आली आहे. वाडीच्या आजूबाजूच्या परिसरात कुठेच पाण्याचा आसरा नसल्यामुळे टँकर उपलब्ध व्हावा अशी मागणी केली आहे.

विजेची मागणी

रत्नागिरी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे वीज व इंटरनेटची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होणार नाही, याची दक्षता शासनाने घ्यावी, असेही सूचित करण्यात आले आहे. चक्रीवादळामुळे वीज व इंटरनेट व्यवस्था कोलमडली आहे.

फेसशिल्डचे वाटप

साखरपा : कनकाडी ग्रामपंचायतीतर्फे ग्रामपंचायत सदस्य व गावातील कर्मचारी यांना फेसबुक शिल्ड उपलब्ध करून देण्यात आले. ग्रामनिधीतून यासाठी निधी खर्च करण्यात आला आहे. ग्रामपंचायत सदस्य, कोतवाल, शासकीय योजना तसेच विविध उपाययोजनांसाठी गावात फिरत असतात.

निधी मंजूर

चिपळूण : चिपळूण नगरपालिकेंतर्गत प्रभागातील विकासकामांसाठी खासदार विनायक राऊत यांनी ७४ लाख रुपयांचा विकास निधी मंजूर केला आहे. वैशिष्ट्यपूर्ण विकास योजनेच्या माध्यमातून हा निधी खर्च केला जाणार असून, १३ प्रभागांतील विकास कामे यातून मार्गी लागणार आहेत.

दुरांतो एक्स्प्रेस रद्द

रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोकण रेल्वेमार्गावरुन धावणाऱ्या आठ स्पेशल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. लोकमान्य टिळक, एर्नाकुलम, दुरांतो स्पेशल एक्स्प्रेस दिनांक २९ जूनपर्यंत रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. याशिवाय अन्य गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

लसीकरण केंद्राची मागणी

मंडणगड : दापोली व मंडणगड तालुक्यांतील नागरिकांना लसीकरणासाठी खेडमध्ये जाणे कोरोना कालावधीत गैरसोईचे आहे. लॉकडाऊन असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड बनले आहे. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी लसीकरण केंद्र तत्काळ सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.

भरारी पथकाची नियुक्ती

रत्नागिरी : तालुकास्तरावरील गुणनियंत्रण कामासाठी तसेच कृषी निविष्ठांच्या तक्रारीबाबत धडक मोहीम राबविण्यासाठी कृषी आयुक्तांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यातील एकूण नऊ तालुक्यांमध्ये भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. तालुका कृषी अधिकारी पथक प्रमुख असून अन्य कृषी अधिकारी, वजनमापे निरीक्षक, मंडल कृषी अधिकारी, सदस्य यांचा यात समावेश आहे.

जैतापूर गावाला भेट

राजापूर : तौक्ते वादळामुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना खासदार विनायक राऊत यांनी भेट देऊन पाहणी केली. तुळसुंदे, जैतापूर, वेत्ये, कशेळी या गावांना भेट देऊन आपद्ग्रस्तांची विचारपूस करण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख जयसिंग माने, चंद्रकांत मणचेकर, भारती सरवणकर, आदी उपस्थित होते.

Web Title: Distribution of health materials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.