कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानमार्फत मोफत स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:22 IST2021-07-10T04:22:13+5:302021-07-10T04:22:13+5:30
दापोली : तालुक्यातील शिरखल चिंचाळी येथील मारुती मंदिरात पालगड प्रभागातील ७४८ विद्यार्थ्यांच्या अध्ययनाची सोय म्हणून कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान महाराष्ट्र ...

कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानमार्फत मोफत स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप
दापोली : तालुक्यातील शिरखल चिंचाळी येथील मारुती मंदिरात पालगड प्रभागातील ७४८ विद्यार्थ्यांच्या अध्ययनाची सोय म्हणून कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान महाराष्ट्र -कल्याणचे संस्थापक अध्यक्ष संजयराव मोरे यांच्या ४७ व्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.
प्रभाग विस्तार अधिकारी विजय बाईत यांच्या संकल्पनेचा विचार शिरखल चिंचाळीचे शिक्षक श्रीराम महाडिक यांनी त्यांचे बंधू व प्रतिष्ठानचे सदस्य सूर्यकांत महाडिक यांच्याकडे व्यक्त केल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय मोरे यांच्याशी संपर्क साधून सुमारे १ लाखा ८१ हजार रु. किमतीच्या ७४८ स्वाध्याय पुस्तिका प्रभागातील जिल्हा परिषद मराठी आणि उर्दू शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देऊ केल्या. संजय मोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सूर्यकांत ऊर्फ नंदूदादा महाडिक, जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुधन समिती सभापती रेश्मा झगडे, पंचायत समितीचे माजी सभापती राजेश गुजर, शिक्षणविस्तार अधिकारी विजय बाईत, सरपंच गोंधळेकर, व्यवस्थापन अध्यक्ष संजय कदम, सर्व केंद्रप्रमुख यांच्या हस्ते त्याचे वितरण करण्यात आले.
प्रतिष्ठानच्या वतीने स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध करून देणारे संजय मोरे आणि सूर्यकांत महाडिक यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सूर्यकांत महाडिक, राजेश गुजर, रेश्मा झगडे याची भाषणे झाली. याच कार्यक्रमात प्रभागातील सेवानिवृत्त शिक्षक अशोक जाधव आणि विलास महाडिक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीराम महाडिक तसेच सेवानिवृत्त शिक्षक अशोक जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणविस्तार अधिकारी विजय बाईत यांनी केले, तर पदवीधर शिक्षक बाबू आग्रे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन आदर्श शिक्षक गणेश तांबीटकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जामगे, पालगड आणि मुगीज केंद्रातील शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले.