मावळंगेत नुकसान
रत्नागिरी : तालुक्यातील मावळंगे गावास चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसला असून त्यामध्ये लाखोंचे नुकसान झाले आहे. ३२ शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून १७१ आंबा कलमे, ७६ काजू, ८४ पोफळी, ३६ नारळ, ९ घरे व जिल्हा परिषद शाळेच्या एका खोलीचे नुकसान झाले आहे.
बियाणांचे वाटप
दापोली : तालुक्यातील सडवे, साखळोली, वाकवली, माैजे दापोली तसेच गुहागर तालुक्यातील कारूळ, खेड तालुक्यातील उधळे व कळंबणी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बियाणांचे वाटप करण्यात आले. कारली, घोसाळी, काकडी, भेंडी, चिबूड, नाचणी व भात बियाणांचे वाटप करण्यात आले.
कामबंद आंदोलन
रत्नागिरी : वीज कामगार, अभियंते व अधिकारी तसेच कंत्राटी कामगारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा द्यावा या प्रमुख मागणीसाठी वीज कंपन्यांमधील सहा संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे सोमवार दि. २४ पासून कामबंद आंदोलन आयोजित करण्यात आले.
भात पेरणीला प्रारंभ
देवरूख : संगमेश्वर तालुक्यात भात पेरणीला प्रारंभ झाला आहे. अनेक ठिकाणी शेतकरी भातपेरणीमध्ये गुंतला आहे. मान्सूनपूर्व पावसाचे आगमन लवकर होणार असल्याने शेतकऱ्यांनी भात पेरणीला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी अद्याप भाजावळीची कामे रखडली आहेत.
नुकसानग्रस्त शाळांना भेट
रत्नागिरी : जिल्ह्यात ‘ताैक्ते’ वादळामुळे अनेक शाळांचे नुकसान झाले आहे. गटशिक्षणाधिकारी सशाली मोहिते यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त शाळांना भेटी देऊन पाहणी केली. माचिवलेवाडी शाळेला भेट दिली. त्यावेळी सरपंच प्रितम माचिवले, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा दिशा माचिवले आदी उपस्थित होते.
रस्त्यावर खड्डे
मंडणगड : मंडणगड-खेड रस्त्यावर केळवत पालघर, कुंबळे, दुधेर गावच्या हद्दीत खड्डेच खड्डे पडले आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम खात्याचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. खड्डेमय रस्ता झाला असून खड्ड्यांत पावसाचे पाणी साचून राहिल्याने वाहन चालविणे अवघड बनले आहे.
तीन महिन्यांच्या वेतनाची मागणी
रत्नागिरी : ‘ताैक्ते’ चक्रीवादळामुळे पीडित झालेल्या राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचे बिनव्याजी अग्रीम वेतन व खास रजा देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी महामंडळाकडे केली आहे.
बीएसएनएल सेवा कोलमडली
खेड : शहरासह ग्रामीण भागातील खासगी, मोबाईल कंपन्यांची सेवा कोलमडली आहे. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे. इंटरनेट सेवा ठप्प असल्याने शासकीय, बँका तसेच खासगी कंपन्यांच्या कामावर परिणाम होत आहे. ग्राहकांना यामुळे हेलपाटे मारावे लागत आहेत.
हळद जनजागृती
खेड : तालुक्यातील हळद लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी पंचायत समितीच्या सेस फंडातून कृषीसाठी निधी राखीव ठेवून अनुदानावर शेतकऱ्यांना बियाणे व खते दिली जाणार आहेत. याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.