नुकसानग्रस्तांना २ कोटी अनुदान वाटप
By Admin | Updated: October 27, 2015 00:09 IST2015-10-26T23:43:09+5:302015-10-27T00:09:41+5:30
संगमेश्वर तालुका : मंडल स्तरावर २ रोजी विशेष मोहीम

नुकसानग्रस्तांना २ कोटी अनुदान वाटप
मार्लेश्वर : संगमेश्वर तालुक्यात फेब्रुवारी व मार्चमध्ये अवेळी पाऊस व गारपीट झाली होती. यामध्ये तालुक्यातील अनेक आंबा व काजू शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यापैकी १ हजार ५४६ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आतापर्यंत २ कोटी ७०८ रुपये इतके अनुदान वाटप करण्यात आले आहे. उर्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जलदगतीने अनुदान प्राप्त होण्यासाठी २ नोव्हेंबर रोजी मंडल स्तरावर विशेष मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
तालुुक्यात फेब्रुवारी व मार्च २०१५ मध्ये अवकाळी पाऊस व गारपीट मोठ्या प्रमाणात झाली होती. यामध्ये आंबा व काजू पिकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. यानंतर कृ षी विभागामार्फ त पंचनामे करण्यात आले होते. याचा अहवाल महसूल विभागाकडे सादर करण्यात आला होता.
मात्र, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सातबारावर असलेल्या सर्व व्यक्तींचे संमत्तीपत्र जोडण्याची जाचक अट शासनाने घातल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या घरातील काही मंडळी कामानिमित्त मुंबई, पुणे सारख्या मोठमोठ्या शहरात बाहेरगावी असतात. अशावेळी केवळ काही हजार रुपये नुकसान भरपाई मिळण्यापोटी या सर्वांना संमत्तीपत्रासाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून बोलावणे शक्य नसल्याचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाने संमत्तीपत्राची जाचक अट रद्द करावी, अशी आग्रही मागणी होत आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ अनुदान मिळावे, यासाठी शासनाकडून मंडल स्तरावर ही विशेष मोहीम राबवण्यात येत असून, अनुदानाची रक्कम संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी २ नोव्हेंबर रोजी आपली परिपूर्ण माहिती मंडल अधिकारी कार्यालयात सादर करावी, असे आवाहन तहसील कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. (वार्ताहर)
संगमेश्वर तालुक्यातील आंबा व काजू नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून सुमारे १३ कोटी ८५ लाख २२ हजार ५०० रुपये इतके अनुदान प्राप्त झाले आहे. परिपूर्ण कागदपत्र सादर केलेल्या १ हजार ५४६ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने २ कोटी ७०८ रुपये इतके अनुदान वाटप केले आहे. परंतु, उर्वरित ११ कोटी ८५ लाख २१ हजार ७१२ रुपयांचे अनुदान शासन केव्हा देणार? असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. ही मदत तात्काळ मिळण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, काही त्रुटींमुळे ही मदत रखडली आहे.