राष्ट्रवादीमध्ये फाटाफूट
By Admin | Updated: November 10, 2014 23:53 IST2014-11-10T23:07:49+5:302014-11-10T23:53:43+5:30
रत्नागिरी नगर पालिका : रत्नागिरीत चार नगरसेवकांचा स्वतंत्र गट

राष्ट्रवादीमध्ये फाटाफूट
रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेमधील राष्ट्रवादीच्या ४ फुटीर नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र दिले आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादीकडून त्यांच्या सहाही नगरसेवकांना व्हीप बजावण्यात आला आहे. या सर्व घडामोडीमध्ये राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांकडून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यात येणार असल्याने नगर परिषदेतील राजकारणाला कलाटणी मिळणार आहे.
आज रत्नागिरी नगर परिषदेतील पक्षीय बलाबल पाहता शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष असून, १३ नगरसेवक आहेत, तर भाजपा ८, राष्ट्रवादी ६ आणि काँग्रेस १ अशी नगरसेवकांची संख्या आहे. गेली २५ वर्षे रत्नागिरी नगरपरिषदेमध्ये शिवसेना-भाजपा युती आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीमध्ये युती तुटल्याने त्याचे परिणाम रत्नागिरी नगर परिषदेच्या राजकीय पटलावर झाल्याचे दिसून येत आहेत.
युतीमध्ये ठरल्याप्रमाणे भाजपचे महेंद्र मयेकर नगराध्यक्ष आहेत. मात्र, आता युती तुटल्यानंतर शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रतोद सुदेश मयेकर यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. मात्र, उदय सामंत यांच्यापाठीमागून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा एक गट आधीपासूनच कार्यरत होता. त्याचा फायदा रत्नागिरी नगर परिषदेतील उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला होणार हे जवळजवळ निश्चित आहे.
दोन दिवसांपूर्वी नगर परिषदेतील राजकीय घडामोडीना वेग आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहापैकी चार नगरसेवकांनी शहर विकास आघाडीच्या नावाखाली वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये नगरसेवक बाळू साळवी, नगरसेविका स्मितल पावस्कर, प्रीती सुर्वे आणि मुनीज जमादार यांचा समोवश आहे. नगरसेवक बाळू साळवी यांच्या नेतृत्त्वाखाली चारही नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना वेगळा गट स्थापन केल्याचे पत्र दिले आहे.
उपनगराध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी, दि. ११ रोजी होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर परिषदेतील राष्ट्रवादीच्या सहाही नगरसेवकांना चार नगरसेवकांचा गट स्थापन होण्यापूर्वी पक्षाकडून पक्षादेश बजावण्यात आला असल्याचे गटनेते नगरसेवक सुदेश मयेकर यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आज पत्र दिले. आपला गट उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे नगरसेवक बाळू साळवी यांनी सांगितले. त्यामुळे शिवसेनेचे संजय साळवी उपनगराध्यक्ष होणार, हे निश्चित झाले आहे. (शहर वार्ताहर)
शहर विकास आघाडी
रत्नागिरी नगर परिषदेत राष्ट्रवादीच्या ४ फुटीर नगरसेवकांनी एकत्र येऊन वेगळा गट स्थापन केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तसे पत्रही दिले असून, आपल्या गटाला शहर विकास आघाडी असे नाव दिले आहे. त्यामुळे शिवसेनेचा उपनगराध्यक्ष होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.