लाखोंच्या अपहारप्रकरणी संचालकांना अपात्र ठरवा

By Admin | Updated: January 13, 2016 01:23 IST2016-01-13T01:21:28+5:302016-01-13T01:23:58+5:30

रत्नागिरी मच्छिमार सोसायटी : संचालक-सचिवांमध्ये संगनमत असल्याचा आरोप

Disqualify the directors of lakhs of disaster | लाखोंच्या अपहारप्रकरणी संचालकांना अपात्र ठरवा

लाखोंच्या अपहारप्रकरणी संचालकांना अपात्र ठरवा

रत्नागिरी : शहरातील राजिवडा येथील रत्नागिरी मच्छिमार सहकारी सोसायटीचे व शासनाचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व सचिव यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष खलील वस्ता यांनी सहाय्यक निबंधकांकडे निवेदनाद्वारे केली
आहे.
रत्नागिरी मच्छिमार सहकारी सोसायटी लि. या संस्थेचे तत्कालीन संचालक मंडळ आणि सचिव यांनी संगनमताने संस्थेत लाखो रुपयांचा अपहार करून आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष वस्ता यांनी सहकार खात्याकडे केली होती. याप्रकरणी सहकार खात्याने चौकशीचे आदेश देऊन प्राधिकृत चौकशी अधिकारी म्हणून एस. एस. नलावडे यांची नियुक्ती केली होती.
या चौकशीमध्ये लाखो रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. त्याप्रमाणे संस्थेच्या माजी व विद्यमान २३ संचालकांकडून दरसाल शेकडा १२ टक्के व्याजदराने लाखो रुपये वसूल करण्याच्या नोटीसा संबंधितांना बजावल्या आहेत. यामध्ये संस्थेचे अध्यक्ष हसन अ. लतीफ दलाल यांच्यावर ५ लाख ३३ हजार २३४ रुपये, उपाध्यक्ष शब्बीर इस्माईल भाटकर ६ लाख ५९ हजार ८९८ रुपये, माजी अध्यक्ष व संचालक नुरुद्दिन आदम वस्ता १ लाख २६ हजार ६१२ रुपये, हिदायत दलाल १ लाख २६ हजार ६१२ रुपये, अन्वर मजीद पावसकर १ लाख २६ हजार ६१२ रुपये आणि सचिव सुभाष रामचंद्र साळुंखे ६ लाख ५९ हजार ८९५ रुपये असे एकूण २३ लाख १८ हजार ८६३ रुपये एवढ्या रकमेचे सोसायटीचे नुकसान केल्याचा ठपका या संचालकांवर ठेवण्यात आला आहे.
संस्थेच्या या आर्थिक घोटाळाप्रकरणी राजिवडा परिसरातील मच्छिमारांमध्ये खळबळ उडाली आहे. संचालकांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी मच्छिमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष वस्ता यांनी सहाय्यक निबंधकांकडे केली आहे. (शहर वार्ताहर)


रत्नागिरी मच्छिमार सहकारी सोसायटी लि., राजिवडा या संस्थेच्या आजी-माजी संचालकांसह सचिवानेही लाखो रुपयांचा अपहार करून संस्थेत आर्थिक गैरव्यवहार केल्याचे पुढे आले आहे. तरीही या संस्थेवर विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि संचालक कार्यरत आहेत. त्यांच्यावर कारवाई कधी होणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, ही कारवाई करण्यास सहकार खात्याकडून चालढकल होत असल्याची चर्चा मच्छिमारांमध्ये सुरु आहे.

Web Title: Disqualify the directors of lakhs of disaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.