बीएसएनएलच्या कृ षी कार्ड सेवेबाबत नाराजी
By Admin | Updated: January 8, 2016 00:49 IST2016-01-07T23:58:40+5:302016-01-08T00:49:15+5:30
योजनांचे विलिनीकरण : महत्त्वाच्या सेवांमध्ये मात्र कपात

बीएसएनएलच्या कृ षी कार्ड सेवेबाबत नाराजी
आबलोली :भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने मोठा गाजावाजा करीत शेतकऱ्यांसाठी महाकृषी कार्ड योजना आणली. त्याद्वारे सर्व शेतकऱ्यांना एकमेकांशी संवाद साधता येईल, विचारांचे आदान प्रदान करता येईल, त्यासाठी १०८, १०९, १२८ या योजना कार्यान्वित करण्यात आल्या. मात्र, या तीनही योजनांचे विलिनीकरण करून सगळ्या योजना १४१ रुपये रिचार्जखाली एकत्र आणल्या. अधिकचे पैसे आकारुन बीएसएनएलने पूर्वीच्या योजनांमधील सेवांमध्ये कपात केली आहे.
अन्य नेटवर्कला फोन करण्यासाठी पूर्वी २०० मिनिटे होती, ती कमी करून फक्त ५० मिनिटे ठेवण्यात आली आणि डाटा वाढवण्यात आला. मात्र, शेतकऱ्यांसाठी डाटापेक्षा संवाद साधणे अधिक गरजेचे होते. त्यामुळे या एकत्र नवीन योजनेबाबत ग्राहकवर्गात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. यावर बीएसएनएलने नामी शक्कल लढवीत पुन्हा एकदा ग्राहकांच्या खिशात हात घातला आहे. अन्य नेटवर्कसाठी वाढीव वेळ मिळवायचा असेल, तर १४१ रिचार्जसह अधिकचे तीन प्रकारचे रिचार्ज नव्याने सुरु केले आहेत.
या योजना कार्यान्वित झाल्या असून, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ग्राहकांच्या खिशाला वाढीव कात्री लावण्याचे काम बीएसएनएलने केल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)
१४१ रिचार्जसह २४ रुपये रिचार्ज केल्यास अन्य नेटवर्कसाठी १५० मिनिटे वाढवून मिळणार आहेत. तसेच ४४ रुपयांचे रिचार्ज केल्यास ६०० एमबी डाटा मिळणार आहे, तर ५९ रुपये रिचार्ज केल्यास अन्य नेटवर्क साठी १५० मिनिटे व ६०० एमबी नेट डाटा वाढवून मिळणार आहे.
अन्य नेटवर्कसाठी २०० मिनिटांवरून ५० मिनिटांपर्यंत कपात.
डाटा वाढवला.
डाटापेक्षा शेतकऱ्यांसाठी संवाद साधणे अधिक महत्त्वाचे.
बीएसएनएलचा ग्राहकांच्या खिशात पुन्हा हात.