सवलतीच्या वीज दरातून रक्तपेढ्यांना वगळले
By Admin | Updated: August 19, 2014 23:49 IST2014-08-19T22:48:51+5:302014-08-19T23:49:07+5:30
शासकीय कार्यालये, पोलीस स्थानक, कोर्ट, तुरूंग, रेल्वेस्थानक, बसस्थानक, पोस्ट कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, अग्निशमन केंद्र, आर्मी, नेव्हल तसेच विमानतळासाठी सवलतीच्या दरात

सवलतीच्या वीज दरातून रक्तपेढ्यांना वगळले
रत्नागिरी : शासकीय कार्यालये, खासगी दवाखाने तसेच अन्य विविध शासकीय सेवा देणाऱ्या कार्यालयांना सवलतीच्या दरात वीज देण्याचे महावितरणने जाहीर केले आहे. राज्य विद्युत नियामक मंडळाच्या आदेशानुसार ही सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या करणाऱ्या केंद्रांना सवलतीच्या दरात वीजपुरवठा करण्यात येणार असून, रक्तपेढ्यांना मात्र त्या सेवेतून वगळले आहे.
सर्व शासकीय कार्यालये, पोलीस स्थानक, कोर्ट, तुरूंग, रेल्वेस्थानक, बसस्थानक, पोस्ट कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, अग्निशमन केंद्र, आर्मी, नेव्हल तसेच विमानतळासाठी सवलतीच्या दरात वीजपुरवठा केला जाणार आहे. मात्र, बसस्थानक व रेल्वेस्थानकांतील दुकाने किंवा विक्री केंद्राना मात्र या सेवेतून वगळण्यात आले आहे. २०० युनिटपर्यंत वापर असणाऱ्यांना ५ रुपये३६ पैसे प्रतियुनिट दराने वीजबिल आकारले जाणार आहे. २०० युनिटपेक्षा अधिक वापर असणाऱ्या ग्राहकांना ७ रुपये ८८ पैसे दराने वीजबिल आकारले जाणार आहे. स्मशानभूमी व विद्युत दाहिनीसाठी ३ रूपये ३७ पैसे दराने वीजबिल आकारण्यात येणार आहे. राज्य विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार व्यावसायिक वापराऐवजी बिल सार्वजनिक सेवादरात वीजबिल आकारणीसाठी महावितरणकडे अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्ज करणाऱ्या शासकीय कार्यालयांना किंवा खासगी दवाखान्यांनाच सार्वजनिक सेवा दराचा लाभ मिळणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा शासकीय रूग्णालय व ११ उपरूग्णालये व ८७ प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. १०० पेक्षा अधिक खासगी दवाखाने आहेत. शासकीय रूग्णालयाबरोबर सर्व खासगी रूग्णालयांना सवलतीच्या दरात वीज मिळणार आहे. त्यामुळे दवाखान्यांची बचत होणार आहे. रक्तपेढ्यांचा जादा वीज वापर असून, संबंधित पेढ्यातून रक्त विक्री होत असल्याने त्याना सवलतीच्या दरातून वगळण्यात आले आहे. व्यावसायिक व खासगी याशिवाय सार्वजनिक सेवा या तिसऱ्या श्रेणीत प्रतियुनिट ९ रूपये, व्यायसायिक दरात प्रतियुनिट ५० पैसेने घट होणार आहे. २० ते ५० किलो वॅट जोडणी व जादा विद्युत वापर असलेल्या दवाखान्यांची प्रतियुनिट तीन रूपयांपर्यंत बचत होणार आहे.
मंदिर, मशिद आदी धार्मिक स्थळांना घरगुती दराने वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच अन्य उत्सव कालावधीत महावितरणकडून सवलतीच्या दरात वीजपुरवठा केला जातो. घरगुती पध्दतीने वीज वापर करण्यापेक्षा महावितरणकडून सवलतीच्या दरात वीज पुरवठा घेतला तर तो निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. अडीच रूपये प्रतियुनिट दराने तात्पुरता वीज पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे घरगुती मीटरवरून वीजवापर करण्यापेक्षा तात्पुरता वीज पुरवठा घेणे निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच अन्य उत्सवांना महावितरणकडून सवलतीच्या दरात वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येतो.
जिल्ह्यातील शासकीय रूग्णालये व सर्व खासगी रूग्णालयांना याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे विजेची बचत होणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)