अपुऱ्या जागेमुळे स्थानकात बस लावण्यासाठी शिस्तीचे पालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:35 IST2021-08-28T04:35:49+5:302021-08-28T04:35:49+5:30
मेहरुन नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : मध्यवर्ती बसस्थानकाचे काम सुरू असल्याने ग्रामीण, लांब पल्ल्यांच्या गाड्या रहाटाघर बसस्थानकातून सोडण्यात ...

अपुऱ्या जागेमुळे स्थानकात बस लावण्यासाठी शिस्तीचे पालन
मेहरुन नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : मध्यवर्ती बसस्थानकाचे काम सुरू असल्याने ग्रामीण, लांब पल्ल्यांच्या गाड्या रहाटाघर बसस्थानकातून सोडण्यात येत आहेत. रहाटाघर बसस्थानकातील अपुऱ्या जागेमुळे गाड्यांची गर्दी केली जात नाही. वेळापत्रकानुसार ज्या मार्गावर गाडी नियोजित वेळेवर सुटणार आहे, तत्पूर्वी अर्धा तास आधी माळनाका येथील आगार कार्यशाळेकडून गाड्या रहाटाघरच्या दिशेने रवाना होतात. फलाटावर दहा मिनिटे आधी गाडी लावली जाते. त्यामुळे एका शिस्तीचे पालन होत असलेले निदर्शनास येत आहे.
रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक रहाटाघर येथे हलविण्यात आले आहे. पहाटे पाच वाजलेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत ग्रामीण व लांब पल्ल्याच्या मार्गावर ८७२ गाड्या सुटतात. शहरी बसस्थानक मध्यवर्ती बसस्थानकालगत आहे. शहरी मार्गावर २५० फेऱ्या दररोज सुटत आहेत. शहरी बसस्थानकाबाहेर गाड्या लावण्यासाठी बऱ्यापैकी जागा आहे; मात्र रहाटाघर येथे अपुऱ्या जागेमुळे गर्दी होऊ नये, यासाठी नियोजनबद्ध गाड्या वेळापत्रकानुसार लावण्यात येत आहे.
रहाटाघर बसस्थानकात फलाटासमोर बसेस दहा मिनीट आधी लावण्यात येत आहेत. त्यामुळे बस काढताना व लावताना शिस्तीचे पालन होत आहे.
बस वेळेवर लावल्या जातात
रहाटाघर बसस्थानकात जागा अपुरी असल्याने रिकाम्या गाड्या लावून गर्दी करण्यापेक्षा वेळापत्रकाचे पालन मात्र प्राधान्याने केले जात आहे. दहा मिनिटे आधी गाडी फलाटावर लावण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना चढणे साेयीस्कर होते. अपुऱ्या जागेमुळे शिस्तीचे पालन केले जात असून, ते कायम राहणे गरजेचे आहे.
- सुबोध पवार, चांदेराई
खड्डे बुजविण्यात यावेत
रहाटाघर येथे बस लावण्यासाठी व काढण्यासाठी गर्दी होत नाही; परंतु परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचून ते गाडीचे चाक खड्ड्यांतून जाताना चिखलमिश्रीत पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत असल्याने खड्डे तातडीने बुजविण्याची आवश्यकता आहे. गणेशोत्सवापूर्वी खड्डे प्राधान्याने बुजविण्यात यावेत.
- रोहित काेलगे, कोतवडे
बसस्थानकाच्या कामामुळे रहाटाघर येथील बसस्थानकातून लांब पल्ल्याच्या, ग्रामीण बसेस सोडण्यात येत आहे. जागा अपुरी असल्याने माळनाका येथील आगार कार्यशाळेतून अर्धा तास आधी गाड्या रहाटाघर येथे पाठविण्यात येतात. शिवाय दहा मिनिटे आधी फलाटावर गाडी लावण्यात येत आहे. त्यामुळे गर्दी, गडबड होत नाही. शिवाय प्रवाशांना गाडीत चढणे सोयीस्कर होत आहे. शहरी बसस्थानक मात्र आहे त्याच ठिकाणी आहे.
- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी.