आपत्ती, पुराचा धोका, त्रास कमी करण्यासाठी विविध उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:38 IST2021-09-17T04:38:47+5:302021-09-17T04:38:47+5:30
रत्नागिरी : निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळ तसेच महापुरामुळे कोकणात अनेक ठिकाणी अतोनात नुकसान झाले आहे. त्यावरील उपाययोजनांसाठी राज्य सरकारने ...

आपत्ती, पुराचा धोका, त्रास कमी करण्यासाठी विविध उपाययोजना
रत्नागिरी : निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळ तसेच महापुरामुळे कोकणात अनेक ठिकाणी अतोनात नुकसान झाले आहे. त्यावरील उपाययोजनांसाठी राज्य सरकारने चार वर्षांचा कार्यक्रम तयार केला असून, त्याकरता ३ हजार ६०७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. या उपाययोजनांमध्ये धूपप्रतिबंधक बंधारे, विजेच्या भूमिगत केबल, तात्पुरत्या स्थलांतरासाठी निवारागृह अशा कामांवर भर दिला जाणार असल्याचे ते म्हणाले.
वादळ तसेच महापुराच्या घटनांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील सर्व जिल्ह्यांना भेट देऊन पाहणी केली. त्या वेळेपासूनच कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देण्याचा विचार सुरू होता. आपण तसेच खासदार विनायक राऊत यांचा त्यासाठी पाठपुरावा सातत्याने सुरू होता. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी एक समिती नेमली आहे. त्याचबरोबर चार वर्षांचा कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यातून निवारागृह, धूपप्रतिबंधक बंधारे, भूमिगत केबल, वादळाबाबतची पूर्वसूचना देणारी यंत्रणा, वीज अटकाव यंत्रणा तसेच दरडप्रवण भागांमधील प्रतिबंधात्मक उपाययोजना अशी कामे केली जाणार आहेत, असे ते म्हणाले.
कायमस्वरूपी उपाययोजनांबाबत नेमण्यात आलेल्या समितीकडून सरकारला अहवाल सादर केला जाईल. या अहवालात जे उपाय सुचवले जातील, तेही प्राधान्याने राबवले जाणार असल्याचे ते म्हणाले.
पुराच्या समस्येसाठी गाळ काढण्याच्या कामाकडेही प्राधान्याने लक्ष दिले जाणार आहे. हा गाळ काढण्यासाठी कोणी पुढे आल्यास त्यांच्याकडून रॉयल्टी न घेण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून डिझेलचा खर्च करून देऊन हे काम करून घेता येईल का, याचीही चाचपणी सुरू असल्याचे ते म्हणाले.
.................................
चिपी विमानतळाला नाथ पै यांचे नाव
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचे नाव देण्याची मागणी केवळ स्थानिक लोकच नाही तर सर्व लोकप्रतिनिधींचीही आहे. आपण तसा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमाेर ठेवला आहे. त्याला अनेक प्रक्रिया आहेत. पण तो मंजूर होईल, असे ते म्हणाले.
..................
रत्नागिरी विमानतळाला टिळकांचे नाव
रत्नागिरीतील विमानतळाबाबत इंटरनेटवर सर्च केले तर लोकमान्य टिळक विमानतळ असे नाव येते. हेच नाव कायम राहणार आहे, असेही सामंत यांनी या वेळी सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला धनंजय कीर यांचे नाव देण्यात आले आहे. सिंधुदुर्गातील उपकेंद्राला स्व. मधू दंडवते यांचे नाव दिले जाणार आहे, असे ते म्हणाले.