चिपळूण नगर परिषदेच्या जागेत थेट विनापरवाना आरसीसी बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:33 IST2021-09-03T04:33:13+5:302021-09-03T04:33:13+5:30
चिपळूण : येथील नगर परिषदेच्या मालकीच्या जागेत कोणतीही परवानगी न घेता थेट आरसीसी बांधकाम करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

चिपळूण नगर परिषदेच्या जागेत थेट विनापरवाना आरसीसी बांधकाम
चिपळूण : येथील नगर परिषदेच्या मालकीच्या जागेत कोणतीही परवानगी न घेता थेट आरसीसी बांधकाम करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाचीदेखील धावपळ उडाली आहे. हे बांधकाम तत्काळ थांबविण्यासाठी प्रशासनाने जोरदार हालचाल सुरू केली आहे. मात्र, या बांधकामाला राजकीय आश्रय असल्याची चर्चाही शहरात सुरू आहे.
शहरातील अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी मार्कंडी परिसरात चिपळूण नगर परिषदेच्या मालकीची सुमारे १० गुंठे इतकी जागा असून, ती जागा एका पेट्रोल पंपाला भाडेतत्वावर दिलेली आहे. त्याबाबतदेखील नगर परिषद आणि भाडेकरू यांच्यामध्ये गेले कित्येक वर्षे वाद सुरू असून, ही बाब आता न्यायप्रविष्ट आहे. रहदारीच्या व मोक्याच्या ठिकाणी ही जागा असल्याने अनेकांच्या नजरा या जागेवर आहेत. आता त्याचठिकाणी थेट आरसीसी बांधकाम करण्याचे धाडस करण्यात आले आहे.
नगर परिषदेच्या मालकीची जागा असतानादेखील कोणतीच परवानगी न घेता किंवा पत्रव्यवहार न करता चक्क आरसीसी स्वरूपाचे पक्के बांधकाम गेल्या काही दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. आता या बांधकामावर स्लॅब ओतण्याचे काम सुरू होताच ही बाब अनेकांच्या निदर्शनास आली. त्यावेळी नगर परिषदेत काहींनी विचारणा केली असता, अशा कोणत्याही बांधकामाला नगर परिषदेने परवानगी दिलेली नसल्याचे स्पष्टपणे समोर आले. नगर परिषद मालमत्ता विभाग तसेच बांधकाम विभागाला या विनापरवाना बांधकामाची माहिती मिळताच प्रशासनाची एकच धावपळ उडाली. या बांधकामाची तातडीने चौकशी आणि पाहणीदेखील करण्यात आली. पुढील कार्यवाहीसाठी हालचाल सुरू करण्यात आली आहे. विनापरवाना बांधकाम तत्काळ थांबविण्यात यावे व झालेले बांधकाम तोडून टाकण्यात यावे, अशा प्रकारची नोटीस संबंधितांना देण्याची कार्यवाही नगरपालिका प्रशासनाने सुरू केली आहे.
------------------------------
चिपळूण नगर परिषदेच्या मालकीच्या जागेत विनापरवाना बेकायदेशीर बांधकाम होत असून, नगर परिषदेच्या निदर्शनाला ही बाब आली आहे. नगर परिषद मालकीच्या जागेचा अशाप्रकारे दुरूपयोग कोणालाही करता येणार नाही. त्यामुळे तातडीने हे बांधकाम थांबविण्याचे आदेश देण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
- अनंत मोरे, प्रशासकीय अधिकारी, चिपळूण.