गणपतीपुळेत पर्यटन दिनानिमित्त दिंडी

By Admin | Updated: September 30, 2015 00:09 IST2015-09-29T21:39:29+5:302015-09-30T00:09:53+5:30

पर्यटकांची लक्षणीय उपस्थिती : दिंडीत उंट व घोडे ठरले खास आकर्षण

Dindi on the occasion of Tourism Day in Ganapatipule | गणपतीपुळेत पर्यटन दिनानिमित्त दिंडी

गणपतीपुळेत पर्यटन दिनानिमित्त दिंडी

गणपतीपुळे : गणपतीपुळे येथे महाराष्ट्र पर्यटन निवास, ग्रामपंचायत आणि अनेक पर्यटन संस्था व संस्थान श्रीदेव गणपतीपुळे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन दिंडी काढण्यात आली.
रविवारी सकाळी ९.३० ते ११ या वेळेत गणपतीपुळे पर्यटन निवास महामंडळाच्या आवारातून पर्यटन दिंडीचा वाजतगाजत शुभारंभ करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर ही दिंडी मोरया चौकातून आपटा तिठ्याकडे व आपटा तिठा येथून प्राचीन कोकण म्युझियम येथे नेण्यात आली.
यावेळी प्राचीन कोकणचे व्यवस्थापक वैभव सरदेसाई यांनी गुलाबपुष्प देऊन उपस्थितांचे स्वागत केले. तसेच उपस्थितांना सरबत पेयाचे वाटप केले. यावेळी सरदेसाई यांनी पर्यटनाबाबत महत्त्व पटवून दिले. त्यानंतर पुन्हा दिंडी एसटी स्टँडपासून कोल्हटकर तिठा व पुन्हा पर्यटन महामंडळाच्या आवारात या दिंडीचे जाहीर कार्यक्रमात रुपांतर झाले.
या कार्यक्रमात आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचे व पर्यटकांचे पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापक नीलेश पित्रे यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. पर्यटनात पर्यटकांची मने जिंकण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यावसायिकाने करावा, असे सांगितले.
त्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश ठावरे यांनी पुढील वर्षी हा कार्यक्रम एका दिवसाचा साजरा होण्यासाठी पर्यटन दिनाच्या दोन दिवस आधी जाखडी, कोकणी खेळे व इतर लोककलांचे कार्यक्रम पर्यटन निवासाच्या आवारात ठेवल्यास या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना याचा लाभ घेतील व कोकणतील सांस्कृतिक कला लोकांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एक अब्ज पर्यटक - एक अब्ज संधी अशा घोषवाक्याने यंदाचा पर्यटन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला गणपतीपुळेचे सरपंच महेश ठावरे, उपसरपंच देवीदास गुरव, गणपतीपुळे पर्यटन निवास महामंडळाचे व्यवस्थापक नीलेश पिसे, गणपतीपुळे पर्यटन व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष प्रमोद केळकर, एमटीडीसीचे निवृत्त व्यवस्थापक दत्तात्रय कुलकर्णी, प्राचीन कोकण म्युझिअमचे वैभव सरदेसाई, लंबोदर पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष उमेश भणसारी, ग्रामपंचायत सदस्य स्मिता माने, संध्या देवरूखकर, प्रसाद कुलकर्णी, अमित घनवटकर, विजय केदार, बाबाराम कदम उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Dindi on the occasion of Tourism Day in Ganapatipule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.