‘डिजिटल इंडिया’चा निर्णय ग्रामसभांच्या खांद्यावर
By Admin | Updated: July 2, 2015 22:46 IST2015-07-02T22:46:29+5:302015-07-02T22:46:29+5:30
कोणत्याही दिवशी गावची सभा बोलावणार

‘डिजिटल इंडिया’चा निर्णय ग्रामसभांच्या खांद्यावर
रत्नागिरी : डिजिटल इंडिया हा भारत सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, तो राज्यात ग्रामस्तरावर राबविण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने ग्रामपंचायतींमध्ये दि. ६ ते ८ जुलै यापैकी कोणत्याही एका दिवशी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्याची सूचना जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींना शासनाकडून देण्यात आली आहे.
हा कालबध्द कार्यक्रम राज्य व केंद्र सरकार संयुक्तपणे राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत.
यामध्ये ग्रामपंचायतींची माहिती, लोकसंख्या, सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्यांची नावे, त्यांचे मोबाईल क्रमांक, कालावधी यांची माहिती संग्राम सॉफ्टवेअरमध्ये अद्ययावत करण्यात येणार आहे. आधार क्रमांकाच्या सहाय्याने सर्वच नागरिकांना संगणकीय लॉकर्स उघडून देण्यात येणार आहे. शहर परिसरातील नागरिकांना वेळोवेळी लागणारे दाखले, महत्त्वाची कागदपत्र नागरिकांना त्यांच्या वैयक्तिक संगणकीय लॉकर्समध्ये विनामोबदला उपलब्ध करुन देण्याची सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आली आहे. या सर्व सुविधा नागरिकांना विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येणार
आहेत.
याबाबतची जनजागृती व माहिती दि. ६ ते ८ जुलै या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामसभेत ग्रामपंचायतींकडून देण्यात येणार आहे. त्यामुळे डिजिटल इंडिया हा उपक्रम तळागाळापर्यंत पोहोचणार आहे. (शहर वार्ताहर)
राज्य शासनाने सन २०१५ हे वर्ष डिजिटलाईज्ड कालबध्द सेवा वर्ष २०१५ म्हणून घोषित केले आहे. यात सर्व उपक्रमांबद्दल माहिती देणे, ई-गव्हर्नन्सअंतर्गत घेण्यात आलेल्या विविध उपक्रम एका छताखाली आणणे. यासाठी ग्रामस्थांना प्रशिक्षित करुन या उपक्रमामध्ये सहभागी करण्यात येणार आहे.