प्रमाणपत्रांसाठी आता डिजिटल खाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 17:21 IST2017-07-22T17:21:40+5:302017-07-22T17:21:40+5:30
राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरी (एनईडी)चा उपक्रम सुरू

प्रमाणपत्रांसाठी आता डिजिटल खाते
आॅनलाईन लोकमत
पाली (जि. रत्नागिरी), दि. २२ : पदवी प्रमाणपत्रापासून ते अगदी गुणपत्रिकांपर्यंत अनेक शैक्षणिक प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना आता डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरी (एनईडी) हा उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसारची प्रक्रिया सुरू झाली असून, मुंबई विद्यापीठही यात सहभागी झाले आहे. नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडमार्फत (एनएसडीपूल) ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मुंबई विद्यापीठाने त्यासाठी विशेष करार केला आहे.
नुकतेच दिल्लीमध्ये विज्ञान भवनात ‘उच्च शिक्षणातील डिजिटल पुढाकार’ याविषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘राष्ट्रीय शैक्षणिक डीपॉझिटरी’ची स्थापना करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रपतींनी जाहीर केलेल्या या ‘एनईडी’ उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावे एक डिजिटल खाते सुरू करण्यात येईल.
त्या खात्यात त्या विद्यार्थ्याला विविध शैक्षणिक संस्थांनी दिलेली प्रमाणपत्र डिजिटल स्वरुपात जमा करता येतील. आधार क्रमांकावरुन या खात्याची ओळख पटविता येणार आहे. त्यामुळे बनावट प्रमाणपत्रांवरुन होणाऱ्या गैरव्यवहारांना चाप लावता येणार आहे. शिवाय पेपरलेसचे उद्दिष्टही साध्य करता येणार आहे. तसेच भविष्यात उच्च शिक्षण संस्था आणि नोकरी देणाऱ्या संस्थाना आॅनलाईन पध्दतीने प्रमाणपत्राची पडताळणी करता येणार आहे.
या योजनेतसाठी नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडबरोबर विशेष करार करण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होणार असल्याचे दिसते आहे.
भांडवली बाजारात सिक्युरिटी डिपॉझिटरीच्या रुपाने एनएसडीएलने जसा विश्वास निर्माण केला आहे. तसाच विश्वास एनईडीद्वारे शिक्षण क्षेत्रात निर्माण करुन या क्षेत्राला लाभ देण्याचा प्रयत्न राहील, असे एनएसडीएलचे संचालक जी. व्ही. नागेश्वरराव यांनी सांगितले.