डिझेल दर घटले; तरीही...!
By Admin | Updated: November 7, 2014 23:32 IST2014-11-07T22:25:25+5:302014-11-07T23:32:11+5:30
तिकीट दर जैसे थे : प्रवाशांच्या माथी मात्र आर्थिक भुर्दंड कायम

डिझेल दर घटले; तरीही...!
मेहरुन नाकाडे -रत्नागिरी
डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर तिकीटाचे दर वाढविण्यात येतात. गतवर्षी तर एस. टी.ने चक्क १२ टक्के दरवाढ केली होती. परंतु आॅक्टोबरमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाल्याने डिझेलचे दर बारा दिवसांच्या फरकाने सहा रूपयांनी घटले. परंतु राज्य मार्ग परिवहन महामंडळाने तिकिटाचे दर कमी करण्याची तसदी घेतली नाही. डिझेल दरातील घट एस. टी.साठी फायदेशीर ठरली असली तरी प्रवाशांना मात्र आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
गतवर्षी डिझेलच्या दरात १२ टक्के वाढ झाली होती. त्यामुळे ज्या ज्यावेळी तिकीट दरात ५० पैसे किंवा एक रूपयांनी वाढ झाली तरी तिकिटामध्ये दरवाढ करण्यात येत होती. मात्र, आॅक्टोबरमध्ये डिझेलच्या किमतीत घट झाली. ऐन दिवाळी सणाच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने डिझेलचे दर सतत दोन वेळा खाली आले. १९ आॅक्टोबर रोजी ३ रूपये २० पैसे, तर ३१ आॅक्टोबर रोजी २ रूपये ५० पैसे प्रमाणे लीटरमागे दर खाली आले.
अरब देशातून अमेरिकेने कच्च्या तेलाची खरेदी कमी केल्याने तेलाचा साठा शिल्लक राहिल्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घट झाली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता पोळून निघाली आहे. परंतु पेट्रोल-डिझेलच्या दरात झालेली घट नागरिकांच्या पथ्यावर पडली आहे. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी ठरलेल्या एस. टी.तून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे डिझेल दर कपातीबरोबर तिकीट दरात घट होणे अपेक्षित आहे. त्यामुळे महामंडळ याबाबत कधी निर्णय घेते, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
एस. टी.च्या भाडेवाढीचा निर्णय घेताना तो पहिल्या टप्प्यातील ६ किलोमीटरच्या पुढे असतो. सध्या पहिल्या टप्प्यातील साध्या गाडीचे भाडे ६ रूपये ३० पैसे, तर निमआराम गाडीचे भाडे ८ रूपये ६० पैसे इतके आहे. त्यामुळे तिकीटाचे दर कमी होतील का? अशी आशा लागून राहिली आहे. याबाबत लवकरच कोणता निर्णय घेतला जाईल व तिकिटाचे दर खरोखरच कमी होतील काय याकडे लक्ष लागले आहे.
महागाईचा फटका
राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एस. टी. जीवनवाहिनी झाली आहे. आजपर्यंत ज्या ज्यावेळी डिझेल दरात वाढ झाली, त्या त्यावेळी तिकीट भाडेवाढ प्रवाशांनी सहन केली आहे. परंतु डिझेलचे दर कोसळले असतील तर तिकिटाचे दर कमी होणे प्रवाशांचा हक्क आहे. महामंडळाने त्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन तिकिटांचे दर कमी करून प्रवाशांना दिलासा द्यावा. लवकरच तिकिटांचे दर कमी होतील, अशी अपेक्षा आहे.
-एम. एम. गुरव, प्रवासी, नेवरे
दरातील चढ उतार कायम
पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर नसतात. त्यामुळे हे दर तात्पुरते असण्याची शक्यता आहे. वास्तविक महामंडळ तोट्यात असतानासुध्दा एस. टी.कडून विविध सवलती देण्यात येत आहेत. स्पेअरपार्टस् तसेच अन्य वस्तूंच्या वाढलेल्या किमती लक्षात घेता महामंडळाला सातत्याने दरवाढ करणे शक्य नाही. तसेच तिकिटाचे दर वाढविणे किंवा कमी करणे हा निर्णय शासनावर अवलंबून असतो.
- संदीप भोंगले, खजिनदार,
महाराष्ट्र राज्य विभागीय संघटना, रत्नागिरी.
भाडेवाढ शासन संमतीनेच
राज्य मार्ग परिवहन महामंडळ तिकीट भाडेवाढ करताना शासनाच्या संमतीनेच करत असते. डिझेलच्या सातत्याने होणाऱ्या दरवाढीमुळे महामंडळाने भुर्दंड सहन केला आहे. त्यामुळे डिझेलचे दर घटले तरी तो अधिकार महामंडळाचा आहे. महामंडळाचा दररोजचा खर्च, मिळणारे उत्पन्न याची सांगड घालून भाडेवाढ केली जाते. त्यामुळे हा निर्णयदेखील महामंडळ व शासनावर अवलंबून आहे.
- एस. एस. सुर्वे,
प्रभारी विभागीय वाहतूक अधिकारी, रत्नागिरी.
बाजारपेठेवर दर अवलंबून
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत कपात झाल्यामुळे डिझेलच्या दरात घसरण झाली. भारत ७० टक्के क्रूड आॅईल अरब देशातून खरेदी करतो. परंतु बाजारपेठेतील परिस्थिती दरावर परिणाम करीत असल्याने डिझेल किंवा पेट्रोलच्या किमती त्यावर अवलंबून असतात. त्यामुळे चढ - उतार सुरूच असतो. ऐन सुटीच्या दिवसात दरात करण्यात आलेल्या कपातीमुळे पेट्रोल पंपधारकांचेही नुकसान झाले आहे.
- उदय लोध,
अध्यक्ष, पेट्रोल डिलर्स असोसिएशन, महाराष्ट्र
अशी स्थिती आहे...
रत्नागिरी जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता एस. टी. वाडी-वस्त्यांवर पोहोचली आहे. सर्वसामान्य जनता एस. टी.वरच अवलंबून आहे. डिझेल दरवाढीमुळे तिकिटाची दरवाढ प्रवाशांनी सोसली आहे. परंतु डिझेल दर कपातीमुळे तिकिटाचे दर खाली येण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. नजीकच्या काळात दर कपात होईल, या आशेवर सर्वसामान्य जनता आहे.
रत्नागिरी विभागात
एकूण गाड्या ७९०
चालक१४७३
वाहक१६००
प्रशिक्षण सुरू
असलेले चालक २४०
दररोजचे किलोमीटर२,१६,०००
एकूण फेऱ्या४५००
दररोज लागणारे ५०,०००
डिझेललीटर