हुकूमशाही वाढली, विद्यार्थीहिताला तिलांजली
By Admin | Updated: June 5, 2015 00:19 IST2015-06-04T23:18:58+5:302015-06-05T00:19:30+5:30
वरवडे शिक्षण मंडळ : आर्थिक अफरातफर अन् संस्थेच्या कारभाराची बेफिकिरी--शिक्षणात हुकूमशाही-२

हुकूमशाही वाढली, विद्यार्थीहिताला तिलांजली
रत्नागिरी : वरवडे पंचक्रोशी शिक्षण मंडळाने गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली खरी; पण गेल्या काही दिवसात अध्यक्ष आणि माध्यमिक विद्यालय, वरवडेचे मुख्याध्यापक यांच्या बेपर्वाई आणि हुकूमशाही कारभारामुळे सध्या संस्थेतच गोंधळ निर्माण झाला असून, त्याचा परिणाम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे.
संस्थेचे अध्यक्ष शरद बोरकर यांच्या मनमानी कारभाराबाबत संस्थेच्या कार्यकारी मंडळातच धुसफूस सुरू आहे. पायकाअंतर्गत एक लाख रुपयांचा निधी वरवडे ग्रामपंचायतीकडे मैदान बनवण्याकरिता २०१४मध्ये वर्ग केला होता. हा निधी ग्रामपंचायतीकडून माध्यमिक विद्यालय, वरवडे या शाळेच्या मैदानासाठी खर्च करण्याचे ठरले. मात्र, मे २०१५पर्यंत शालेय मैदानाचे कोणतेही काम झालेले नाही. या मैदानाचा ठेका समीर शरद बोरकर यांच्याकडे आहे. अंदाजे केवळ ६ लोड चिरा व १ ब्रास पांढरी वाळू मैदानात पडली आहे. याबाबत आता जिल्हाधिकाऱ्यांना संस्थेच्या अन्य सदस्यांनी निवेदन सादर केले आहे.
१२ मार्च २०१४ ते ८ मार्च २०१५ या कालावधीत मंडळाची एकही बैठक झालेली नाही. १२ मार्चच्या झालेल्या बैठकीत त्यापूर्वीच्या अध्यक्ष आणि सचिव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त वाचन करण्यात आले. त्याला सदस्यांनी तीव्र आक्षेप घेत केवळ दोन पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक होऊ शकत नाही, असा पवित्रा घेतला. हा वाद वाढल्याने अध्यक्ष बोरकर हे स्वत: बैठकच सोडून निघून गेले. त्यामुळे बैठक झाली नाही. १९ जानेवारी २0१४ रोजीच्या बैठकीत इतर सदस्यांनी सचिवांना दूरध्वनीव्दारे बैठकीला येण्यासाठी ३० ते ३५ मिनिटे उशिर होत असल्याचे कळवूनही अध्यक्षांनी बैठक सोडून दिली व जाताना इतिवृत्ताची वहीदेखील घेऊन गेले. त्यानंतर माजी अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सचिव व इतर सदस्यांनी सभा घेतली. नऊपैकी आठ सदस्यांनी ही सभा घेऊनही ती अध्यक्षांनी ग्राह्य धरली नाही.
अशा अनेक कारणांनी अध्यक्षांची मनमानी सुरू असल्याने संस्थेने शैक्षणिक संकुलांकडे, विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे लक्ष देण्याऐवजी परस्परांची उणीदुणी काढण्यातच धन्यता मानल्याचे दिसून येते. संस्थेच्या सदस्यांनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या. अगदी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांचा निकालही अध्यक्षांविरोधात गेला. तरीही अध्यक्षांच्या कारभारात सुधारणा झाली नाही. त्यामुळे संस्थेचे हित बाजूलाच केवळ स्वत:चं हित साधण्यामध्येच संस्थाध्यक्ष मशगुल असल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)
मुख्याध्यापकांवरही आरोप
माध्यमिक विद्यालय, वरवडेच्या मुख्याध्यापकांवरही याप्रकरणी आरोप आहेत. शाळेच्या बँक खात्यातून अनेकवेळा विनापरवानगी पैसे काढण्यात आले आहेत. त्यासाठी व्यवस्थापक मंडळाची मंजुरीही घेण्यात आलेली नाही. हे पैसे कोणत्या कारणासाठी काढण्यात आले, याचेही मुख्याध्यापकांकडे उत्तर नसल्याने कार्यकारिणीने आक्षेप नोंदवले आहेत. याच ठिकाणी असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशार्थी विद्यार्थ्यांकडून देणगी उकळली जात असून, त्याची पावतीही दिली जात नाही. याबाबत मुख्याध्यापकांविरोधात पालकांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे तक्रारही केल्याचे समजते.