धूम स्टाईलवाल्यांची अखेर झाडाझडती सुरू
By Admin | Updated: November 7, 2014 23:31 IST2014-11-07T22:27:17+5:302014-11-07T23:31:40+5:30
दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई --वाहतूक पोलिसांची रत्नागिरीत मोहीम :

धूम स्टाईलवाल्यांची अखेर झाडाझडती सुरू
रत्नागिरी : धूम स्टाईलने गाड्याची रेस लावण्याच्या प्रकाराने रत्नागिरीकर हैराण झाले आहेत. याबाबत नागरिकांच्या तीव्र संतापानंतर वाहतूक पोलिसांनी तुफान वेगाने दुचाकी हाकणाऱ्या व शर्यत लावणाऱ्या तरुणांविरोधात शहरात जोरदार मोहीम सुरू केली आहे. आज जयस्तंभ, माळनाका, मारुती मंदिर तसेच टीआरपी पुलाजवळ गाड्या तपासण्याची व भरधाव वेगाने दुचाकी हाकणाऱ्यांची वाहतूक पोलिसानी झाडाझडती घेतली. गेले काही दिवस रत्नागिरीत प्रचंड वेगाने स्पोर्टस बाईक चालवतानाच मध्येच जोरात किंंचाळणे व अचानक ब्रेक लावत रस्त्यावर टायर घासत स्पार्किंग करणे असे प्रकार सुरू आहेत. याला सर्वसामान्य रत्नागिरीकर मात्र कंटाळले आहेत. आता रत्नागिरीकरांची तक्रार लक्षात घेऊन पोलिसांनी अशा शर्यतबाजांविरोधात दोन दिवसांपासून मोहीम हाती घेतली असून गुरुवारी ४४, तर आज (शुक्रवार) ४९ जणांवर कारवाई करण्यात आली. मात्र, दुचाकींच्या शर्यती अद्याप थांबलेल्या नाहीत. गेल्या काही दिवसांपासून या स्पोर्टसबाईकवाल्या तरुणांकडून जयस्तंभ ते मारुती मंदिर व थिबा पॅलेस ते भाट्ये तसेच शहरातील मांडवी भागातही दुचाकीच्या शर्यती लावण्याचे प्रकार सुरू आहेत. गेल्या दोन दिवसांच्या काळात वाहतूक पोलिसांनी रत्नागिरी शहर व परिसरात भरधाव वेगाने गाड्या हाकणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. ही मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी दिली. (प्रतिनिधी) संतप्त रत्नागिरीकरांकडून चांगलीच धुलाई पोलिसांच्या मोहिमेला अंशत: यश आले असले तरी आता संतप्त रत्नागिरीकरांनी पुढील पाऊल उचलले आहे. शहरातील काही सामाजिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी रात्रीच्या वेळी जागता पहारा देणे सुरू केले आहे. अन्य मंडळेही धूम स्टाईल गाड्या चालविणाऱ्यांना पकडण्यासाठी कामाला लागली आहेत. अशा धूमचालकांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्याची खास योजना आखली आहे, अशी चर्चा या मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. गुरुवारी शहरातील मांडवी येथे धूमस्टाईल दुचाकी चालविणाऱ्या काही स्वारांना पकडून नागरिकांनी त्यांची चांगलीच धुलाई केली. पालकांनाही जबाबदार धरावे बेफाम दुचाकी चालवून स्वत:चा, अन्य वाहनचालकांचा व पादचाऱ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या तरुणांवर पोलीस कारवाई करीत असले तरी या तरुणांकडे दंडाची रक्कम भरण्याची ऐपत असल्याचेही पुढे येत आहे. त्यामुळे ज्या बड्या लोकांची ही मुले आहेत व जे आपल्या मुलांना स्पोर्टस बाईक घेऊन देतात, त्या पालकांनाही जबाबदार धरावे.