निकाल ऐकण्यासाठी आज धनश्री हवी होती...!

By Admin | Updated: June 3, 2014 01:58 IST2014-06-03T01:53:44+5:302014-06-03T01:58:09+5:30

वडील नाहीत, आई नाही...आहे तो तिच्या आठवणीत रमणारा तिचा भाऊ...

Dhan Dhri wanted to hear the results today ...! | निकाल ऐकण्यासाठी आज धनश्री हवी होती...!

निकाल ऐकण्यासाठी आज धनश्री हवी होती...!

श्रीकांत चाळके / खेड तिनं मोठं होण्याची स्वप्नं पाहिली होती. बारावीच्या शास्त्र शाखेत शिकताना तिला सीईटीही द्यायची होती. दुर्दैवानं तिचा अपघात झाला, अन् स्वप्न मागे ठेवून ती निघून गेली. सोमवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात ती उत्तीर्ण झाल्याचं स्पष्ट झालं. पण हा निकाल ऐकण्यासाठी ती नाही... तिचे वडील नाहीत, आई नाही...आहे तो तिच्या आठवणीत रमणारा तिचा भाऊ... धनश्री प्रवीण कदम... बारावीत शिकणारी चुणचुणीत मुलगी. खेडनजीकच्या भरणे येथे राहणारी धनश्री यंदा बारावीच्या परीक्षेला बसली होती. ती भरणेतील नवभारत हायस्कूलमध्ये शिकत होती. बारावीची परीक्षा दिल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी दिशा ठरवण्यासाठी ती सीईटीची परीक्षा देण्यासाठी म्हणून रत्नागिरीकडे यायला निघाली आणि त्यानंतरच्या काही तासात सारं काही होत्याचं नव्हतं झाले. तिच्या हुशारीचं, कर्तबगारीचं आणि धडपडीचं सगळ्यात जास्त कौतुक ज्यांना होतं ते तिचे बाबा प्रवीण रामचंद्र कदम हेही आज नाहीत... पोरक्या झालेल्या तिच्या भावाला तिच्या पास होण्याचा आनंदही वाटणार नाही... कारण हा निकाल ऐकण्याआधीच ती अनंताच्या प्रवासात विलीन झाली आहे. ती खेडहून आपले आई-वडील आणि मैत्रिणींसोबत रिक्षाने रत्नागिरीकडे येण्यासाठी निघाली. संगमेश्वर येथे रिक्षा अपघातात केवळ धनश्रीचा बळी गेला. तिचा मृतदेह रत्नागिरी रूग्णालयातून खेडकडे नेला जात असताना तिचे आई-वडील कारमधून पुढे जात होते. मात्र दुर्दैवाने कारचा अपघात झाला आणि त्यात त्या दोघांचीही प्राणज्योत मालवली. आज बारावीचा निकाल जाहीर झाला. धनश्रीला ६५0पैकी ३६६ गुण म्हणजेच ५६.३0 टक्के गुण मिळाले. तिने बारावी उत्तीर्ण होण्यासाठी केलेली धडपड आज तिच्या निकालातून दिसून आली आणि तिच्या भावाला, शुभमला हुंदका आवरता आला नाही. धनश्रीच्या जाण्यानंतर एकाकी उरलेल्या शुभमला आज निकालानिमित्ताने लाडक्या दिदीची पुन्हा आठवण आली.

Web Title: Dhan Dhri wanted to hear the results today ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.