देवरूख आमसभेत अधिकारी धारेवर

By Admin | Updated: January 13, 2015 00:11 IST2015-01-12T22:51:20+5:302015-01-13T00:11:21+5:30

बांधकाम, महावितरणवर आगपाखड : इकोसेन्सिटिव्ह गावे वगळण्याचा ठराव

Devrukh Amsabha officer in charge | देवरूख आमसभेत अधिकारी धारेवर

देवरूख आमसभेत अधिकारी धारेवर

देवरुख : संगमेश्वर पंचायत समितीच्या आमसभेत सोमवारी एस. टी., बांधकाम विभाग, महावितरण, कृषी, घरकुले, पाणीपुरवठा या विषयांवर सर्वाधिक चर्चा करण्यात आली. महावितरण व बांधकामच्या काही अधिकाऱ्यांना धारेवर धरत इको सेन्सिटिव्हमधील गावे वगळण्यात यावीत, असा ठराव आमसभेमध्ये मंजूर करण्यात आला.तीन तास चाललेल्या आमसभेमध्ये अनेकांना आपले प्रश्न मांडता आले नाहीत. तसेच महत्त्वाचे प्रश्न चर्चिले न गेल्याने नाराजी व्यक्त करीत सभा गुंडाळण्यात आल्याची भावना काहींनी सभागृहात बोलून दाखविली. ही आमसभा यापूर्वी दोनवेळा रद्द झाली होती. सभेमध्ये प्रथम एस. टी. या विभागापासून चर्चा करण्यात आली. यावेळी हल्ली एस. टी.मध्ये नव्याने भरती झालेल्या चालकांच्या वेगावर लगाम लावला पाहिजे, अशी मागणी विजय पांचाळ यांनी केली. तसेच अनेकांनी बसफेऱ्यांच्या अनियमिततेबाबत एस. टी. सुरु करण्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. एसटीवर अनेक प्रश्न असल्याने आ. चव्हाण यांनी आगार व्यवस्थापक यांना गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना केल्या. तसेच विभागीय अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्या, असेही सुचित केले.याबरोबरच महावितरणच्या वर्षानुवर्षे गंजलेला पोलचा प्रश्न जैसे थे असल्याचे बोरुकर व गुरव यांनी स्पष्ट केले. पालकमंत्र्यांच्या आदेशाने एखादे काम तीन दिवसात होते, तर अन्य कामांना का इतका वेळ लागतो, असे खडे बोल आमदार चव्हाण यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सुनावले. तसेच गंजलेले पोल प्राधान्याने बदलण्यात यावेत, असा निर्णय घेण्यात आला.
तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनेक रस्ते उखडलेले असताना अधिकाऱ्यांकडून चालढकल होताना दिसत असल्याने सार्वजनिक बांधकामचे शाखा अभियंता यांना आ. चव्हाण यांनी धारेवर धरत तुम्ही स्थानिक आहात तरीदेखील तुम्ही असे का वागता? तुम्ही खोत झाले आहेत अशा कडक शब्दात सुनावले. तर युयुत्सू आर्ते यांनी फणसट धनगरवाडी येथील ३० लाख रुपये खर्चून केलेला रस्ता पळविला आहे, असे सभागृहात सांगत मंजूर झालेला निधी अन्य ठिकाणी खर्च कसा झाला, याबाबत चौकशीची मागणी आर्ते यांनी केली. यापुढे तालुक्यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्याचे काम काणे करते? असा सवाल भाई बोरुकर, छोट्या गवाणकर यांनी उपस्थित केला.
कृषीमध्ये आलेल्या विषयांची तसेच आंगवली सोनारवाडीतील घरकुलांची चौकशी करण्यात यावी, असे अध्यक्षांनी स्पष्ट केले. तर गोळवली अंगणवाडी सेविका तसेच काही शिक्षक आपल्या शाळा सोडून पंचायत समिती आवारात फिरत असतात, त्यांची चौकशी व्हावी. याखेरीज धामणी बडदवाडी येथे २००७ मध्ये भारत निर्माणमधून पाणी पुरवण्याचे काम अद्यापही झालेले नाही, असे निदर्शनास आणून देत याकडे लक्ष देण्याची मागणी धामणीचे ग्रामस्थांनी केली.
सभा आवरती घेतल्याने बावा चव्हाण, ललिता गुडेकर आदींना आपले प्रश्न आटोपते घ्यावे लागले. या सभेला आमदार सदानंद चव्हाण, जिल्हा परिषद शिक्षण सभापती ऐश्वर्या घोसाळकर, पंचायत समिती सभापती मनीषा गुरव, उपसभाती संतोष डावल, नगराध्यक्ष स्वाती राजवाडे, उपनगराध्यक्ष मनीष सावंत, जिल्हा परिषद सदस्य राजेश मुकादम, विलास चाळके, वेदा फडके, माजी उपसभापती संतोष थेराडे, गटविकास अधिकारी रश्मी कुलकर्णी, तहसीलदार वैशाली माने, युयुत्सू आर्ते, नीलम हेगशेट्ये, मुख्याधिकारी शिल्पा नाईक आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Devrukh Amsabha officer in charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.