गणपतीपुळेत याहीवर्षी भाविक ‘श्रीं’च्या स्पर्श दर्शनापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:32 IST2021-09-11T04:32:59+5:302021-09-11T04:32:59+5:30
गणपतीपुळे : काेराेनाच्या निर्बंधामुळे रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील ‘श्रीं’चे मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे गावातील ग्रामस्थांना ...

गणपतीपुळेत याहीवर्षी भाविक ‘श्रीं’च्या स्पर्श दर्शनापासून वंचित
गणपतीपुळे : काेराेनाच्या निर्बंधामुळे रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील ‘श्रीं’चे मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे गावातील ग्रामस्थांना याहीवर्षी स्पर्श दर्शनापासून वंचित राहावे लागले. मंदिरासमाेरील समुद्राच्या दिशेला असणाऱ्या गेटसमाेर दुर्वा, फुले, नारळ अर्पण करून भाविकांनी कलश दर्शन केले.
कोरोनामुळे सर्वच धार्मिक स्थळे व मंदिरे बंद आहेत. शासनाच्या नियमानुसार गणपतीपुळे देवस्थाननेही मंदिर बंद ठेवले आहे. गणपतीपुळे येथील ग्रामस्थ आपल्या घरी गणेशाची मूर्ती स्थापन करत नाहीत. गणेशचतुर्थी दिवशी गावातील ग्रामस्थांना ‘श्रीं’चे स्पर्श दर्शन घेऊनच उत्सव साजरा करतात. पाचशे वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून मंदिर बंद असल्यामुळे सर्व भाविक स्पर्श दर्शनापासून वंचित आहेत.
यावर्षी संस्थानतर्फे जिल्हाधिकारी यांना पत्र दिले हाेते. या पत्रानुसार तसेच जिल्हाधिकारी दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक गावातील २५ ग्रामस्थांना ‘श्रीं’चे मुखदर्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी नेवरे-काजिरभाटी येथील २५ व भगवतीनगर येथील २५ अशी ५० लोकांची नावे ग्रामपंचायतीकडून देवस्थानला प्राप्त झाली हाेती. मात्र, या प्रकाराला गणपतीपुळे परिसरातील अन्य गावांनी विराेध केला. गावातील माेजक्याच लाेकांची नावे ठरवायची काेणी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. काेणीही आपल्या घरी गणपती आणत नसल्याने प्रत्येकाला ‘श्रीं’चे दर्शन हाेणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यामुळे या ग्रामस्थांनी केवळ कलश दर्शन घेऊन मनाेभावे पूजा केली, तर नेवरे - काजिरभाटी व भगवतीनगर येथील ग्रामस्थांना मुख दर्शन देण्यात आले.