‘मलपी’च्या धर्तीवर विकास
By Admin | Updated: July 24, 2014 23:12 IST2014-07-24T23:06:05+5:302014-07-24T23:12:02+5:30
ॅमिरकरवाडा बंदर : दुसऱ्या टप्प्यासाठी ७७ कोटींचा खर्च अपेक्षित

‘मलपी’च्या धर्तीवर विकास
प्रकाश वराडकर -रत्नागिरी ,,येथील मिरकरवाडा बंदराच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पर्यावरणविषयक आवश्यक मंजुरी देतानाच अंशत: निधीची घोषणाही केंद्र सरकारने केली आहे. या बंदराच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ७७ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, पर्यावरणविषयक मंजुुरीमुळे या टप्प्याचे काम होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्नाटकमधील बंदराच्या धर्तीवर विकसित होणाऱ्या या बंदरामुळे मच्छिमारांना बंदराच्या क्षेत्रातच व्यवसायासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत.
गेल्या १५ वर्षांपासून मिरकरवाडा बंदराचा हा दुसरा टप्पा प्रलंबित होता. हा टप्पा व्हावा, यासाठी रत्नागिरीतील स्थानिक मच्छिमार आग्रही होते. पहिल्या टप्प्यात जेटी व बंदर उभारणी झाली खरी परंतु मच्छिमार व्यावसायिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. वाहतूक साधनांचा, गोदाम, शीतगृह, लिलाव हॉल यासारख्या अनेक असुविधांमुळे मच्छिमार त्रस्त होते. गेल्या दोन वर्षांच्या काळात या प्रकल्पासाठी खऱ्या अर्थाने राजकीय स्तरावर प्रयत्न सुरू झाले. केंद्रीय कृषी मंत्री असताना शरद पवार यांनी या बंदराच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रस्ताव तातडीने मागवून घेतला होता. त्यानंतर त्यांनी या दुसऱ्या टप्प्यास मंजुरी दिली होती. परंतु केंद्राच्या पर्यावरण मंत्रालयाकडून या प्रकल्पास नाहरकत दाखला मिळाला नव्हता. त्यासाठीची आवश्यक कागदपत्र पालकमंत्री उदय सामंत यांनी केंद्राकडे पाठविली होती. या कामाला पर्यावरणणविषयक मंजुरी देऊन अंशत: निधीला केंद्राने मंजुरी दिली आहे. बंदराच्या या दुसऱ्या टप्प्यास अनेक वर्षांचा विलंब झाल्याने मच्छिामारांना जेटीवर व्यावसायिक कारणासाठी शेड, झोपड्या उभाराव्या लागल्या. मात्र या झोपड्या अनधिकृत ठरवून दोनवेळा तोडण्यात आल्या होत्या. पुन्हा या झोपड्या व शेडस उभारण्यात आल्या आहेत. मात्र बंदराच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होताना या झोपड्या काढण्याची हमी मच्छिमार देत आहेत.