घरफोड्या करणाऱ्यांना मध्यप्रदेशात अटक
By Admin | Updated: July 4, 2014 23:44 IST2014-07-04T23:32:15+5:302014-07-04T23:44:18+5:30
रत्नागिरी, चिपळुणात चोऱ्या

घरफोड्या करणाऱ्यांना मध्यप्रदेशात अटक
रत्नागिरी : रत्नागिरी शहर, चिपळूण व जिल्ह्याच्या इतर भागात रात्रीच्यावेळी घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या मध्यप्रदेशातील गॅँगच्या दोन चोरट्यांना रत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशातील अलीराजपूर व झार जिल्ह्यात जाऊन अटक केली आहे. मुन्शी मंगालिया भुवरिया (४५, अलिराजपूर) व कंबरसिंंग केरू मुजारदार (३८, रा. नरवाली, ता. कुकशी, जि. धार) अशी या आरोपींची नावे असून, चोरीसाठी वापरली जाणारी १४ लाखांची महिंद्रा झायलो गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. त्यांच्याकडून अनेक घरफोड्या उघड होण्याची शक्यता आहे.
चोरटे हे तब्बल १२०० किलोमीटर्स एवढ्या दूरच्या अंतरावरून रत्नागिरी जिल्ह्यात येऊन घरफोड्या करीत असल्याचे या कारवाईमुळे स्पष्ट झाले आहे. २७ जून २०१३ रोजी घरफोडी करून जात असताना झायलो गाडी चिपळूण अलोरे पोलिसांना हूल देऊन पळून गेली होती. त्या गाडीचा अर्धवट नंबर पोलिसांना मिळाला होता. त्यावरून गुन्हा अन्वेषण शाखेने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या गाडीचा शोध घेतला. गुन्हा अन्वेषणचे पथक त्यासाठी झाबुया व अलिराजपूर जिल्ह्यात तपासासाठी गेले होते.
अर्धवट नंबर मिळालेली झायलो गाडी व मालक मुन्शी भुवरिया हा बोहरी, ता. झोबर, जिल्हा-अलिराजपूर येथे असल्याची माहिती मिळताच त्याच्या घरी छापा टाकून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व नंतर कंबरसिंग केरूला ताब्यात घेण्यात आले. हे लोक भिल्ल समाजाचे असून दुर्गम भागात राहतात. पोलीस पकडायला गेल्यावर त्यांच्यावर तिरकामट्याने हल्ला करतात. अशा स्थितीतही स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. कारवाई करणाऱ्या या पथकात गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील, जमीर पटेल, तानाजी मोरे, किरण भाटकर, संजय शिंगे, शांताराम पंदेरे, प्रवीण बर्गे, वैभव मोरे, सागर साळवी, विक्रम पाटील, पांडुरंग जवरत, अमोल गमरे, रमीज शेख यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)