उपकोषागार महिला अधिकारी लाच घेताना अटकेत
By Admin | Updated: July 4, 2014 00:18 IST2014-07-04T00:03:54+5:302014-07-04T00:18:27+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले

उपकोषागार महिला अधिकारी लाच घेताना अटकेत
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील उपकोषागार कार्यालयातील उपकोषागार अधिकारी डी. डी. केळकर या महिलेला ५०० रुपयांची लाच घेताना रत्नागिरीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही घटना आज (गुरुवारी) दुपारी १.४५ च्या सुमारास कार्यालयातच घडली.
देवरुख सार्वजनिक बांधकाम उपविभागातील एका चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याने २ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या कर्मचाऱ्याच्या भविष्यनिर्वाह निधीचे १ लाख रुपयांचे देयक मंजूर करण्यासाठी या महिला अधिकाऱ्याने १००० रुपयांची मागणी केली होती. हे देयक मंजूर करण्यास टाळाटाळ करीत असल्याने अखेर त्रस्त झालेल्या या कर्मचाऱ्याने रत्नागिरीत धाव घेत तक्रार दिली होती. यानुसार गुरुवारी दुपारी १.४५ च्या सुमारास लाचलुचपत विभागाने सापळा रचून या उपकोषागार अधिकारी केळकर यांना ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. याबाबतचा पंचनामा सुरु आहे. दरम्यान, पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले असून, चौकशी सुरुच आहे. ही कारवाई करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विराग पारकर, पोलीस निरीक्षक लोकेश कानसे, सहायक उपनिरीक्षक मधुकर घोपाळे, हेडकॉन्स्टेबल बाळा जाधव यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)