उपनगराध्यक्ष निवडणूक शुक्रवारी
By Admin | Updated: February 23, 2016 00:23 IST2016-02-23T00:23:07+5:302016-02-23T00:23:07+5:30
रत्नागिरी पालिका : सेनेतर्फे विनय मलुष्टेंचे नाव निश्चित..

उपनगराध्यक्ष निवडणूक शुक्रवारी
रत्नागिरी : रत्नागिरीच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक येत्या २६ फेबु्रवारीला जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेचे संजय साळवी यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. आता या पदासाठी येत्या शुक्रवारी निवडणूक होत असून, शिवसेनेतर्फे विनय तथा भय्या मलुष्टे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सेनेच्या गोटातून सांगण्यात आले. सेनेच्या विरोधात भाजपसह अन्य पक्ष उमेदवार उभा करणार का, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
रत्नागिरी पालिकेत सत्तेवर येताना युतीतील सेना व भाजप घटक पक्षांनी नगराध्यक्षपद व उपनगराध्यक्षपद प्रत्येकी सव्वा वर्ष असे चार टप्प्यात घेण्याचे नियोजन केले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युती तुटल्याने रत्नागिरी पालिकेतील राजकीय समिकरणे बदलली आहेत. गेल्या तीन महिन्यात शहरात पाच जागांसाठी झालेल्या पोटनिवडेणुकीतही या पक्षांमध्ये सख्य नव्हते. पोटनिवडणुकीतील विजयामुळे पालिकेत शिवसेनेचे संख्याबळ १५ झाले आहे. नगराध्यक्ष असलेल्या भाजपचे संख्याबळ ८ आहे. भाजपसह उर्वरित पक्षांचे संख्याबळ १३ आहे. परिणामी उपनगराध्यक्षपद हे सेनेकडेच पुन्हा जाणार हे स्पष्ट आहे.
भाजपने शब्द पाळला नाही तरी सेनेतील दुसऱ्या सदस्याला उपनगराध्यक्षपदाची संधी मिळावी यासाठीच संजय साळवी यांनी आपल्य पदाचा राजीनामा नगराध्यक्षांकडे दिला होता. येत्या २६ फेब्रुवारीला नगरपरिषदेच्या सभागृहात ही निवडणूक होणार आहे. सकाळी १० ते १२ वाजेयर्पंत उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. १२.३० वाजेपर्यंत छाननी व नंतर निवडणूक प्रक्रिया होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पालिका मुख्याधिकारी एम. बी. खोडके काम पाहणार आहेत. (प्रतिनिधी).