कंत्राटी कामगार वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:32 IST2021-05-27T04:32:53+5:302021-05-27T04:32:53+5:30
रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या वाढीमुळे गेली दोन वर्षे आरोग्य यंत्रणा तणावाखाली काम करत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानामधून कंत्राटी पद्धतीने ...

कंत्राटी कामगार वंचित
रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या वाढीमुळे गेली दोन वर्षे आरोग्य यंत्रणा तणावाखाली काम करत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानामधून कंत्राटी पद्धतीने डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय यांची नियुक्ती करण्यात आली. सेवामुक्तीनंतर पुन्हा ही नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, त्यांना विमा कवचांपासून वंचित ठेवण्यात आले आहे.
यंत्रणा सज्ज
रत्नागिरी : आपत्कालीन परिस्थितीसाठी कोकण विभागातील सर्वच प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जीवरक्षक बोटी, जॅकेटस् व इतर सामग्री उपलब्ध आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) तुकडी चिपळूण येथे तैनात केली जाणार आहे.
दोन जिल्ह्यांचा आराखडा
रत्नागिरी : माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांच्या सूचनेनुसार रत्नागिरी व सिंधुदुर्गसाठी व्यापक आराखडा तयार करण्याचे काम भारत संचार निगमचे अधिकारी करत आहेत. या आराखड्यासह प्रभू स्वत: दूरसंचार मंत्र्यांची बैठक घेणार असून त्याची अंमलबजावणी झाल्यास रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात डिजिटल क्रांती होणार आहे.
काळा सप्ताह
रत्नागिरी : शेतकरी व कामगार यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे २७ मेपासून काळा सप्ताह पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचे काम ग्रामपथकासोबत करण्यास नकार दिल्यामुळे अधिकाऱ्यांनी त्रास दिला. त्यामुळे आंदोलन करून काळा सप्ताह पाळण्यात येणार आहे.
खांब बदलण्याची मागणी
राजापूर : तालुक्यातील कोतापूर घुमेवाडी येथील विजेचे खांब गंजले असून तळाकडील भाग सडला आहे. हे खांब केव्हाही पडण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने खांब बदलण्याची मागणी शिवतेज प्रतिष्ठानतर्फे करण्यात आली आहे.
ग्राहकांची गैरसोय
गुहागर : तालुक्यातील कोतळूक बागकर स्टॉप येथील भारत संचार निगमचा टॉवर बंद असून रेंज नसल्यामुळे परिसरातील ग्राहकांची गैरसोय होत आहे. हा टॉवर तातडीने कार्यान्वित न केल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मोबाईल टॉवर बंद असल्याने केवळ शोभेचे बाहुले ठरले आहे.
विजेचा लपंडाव
मंडणगड : तौक्ते वादळानंतर अद्यापही तालुक्यामध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे. रात्री-अपरात्री अचानक वीज खंडित होत असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. उष्म्यामुळे घामाने नागरिक हैराण होत असून त्यातच विजेच्या लपंडावामुळे कमालीचा त्रास सोसावा लागत आहे.
शिक्षकांमध्ये नाराजी
रत्नागिरी : राज्यातील शिक्षकांना कोरोनासंदर्भातील सेवेत मोठ्या प्रमाणावर सामील करून घेतले जात आहे. ५५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या शिक्षकांनाही कोरोनाच्या सेवा बंधनकारक करण्यात आल्याने शिक्षक संघटनांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ५० वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या शिक्षकांना ड्युटी किंवा सेवा लावू नये, अशी मागणी होत आहे.
कर्मचाऱ्यांचा बहिष्कार
रत्नागिरी : पोषण ट्रॅकर अॅप उपलब्ध झाले पाहिजे. अन्यथा अंगणवाडी कर्मचारी त्यावर बहिष्कार टाकतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिला आहे. या मुख्य मागणीसह अनियमित पोषण आहार, विमा व मोबाईल प्रोत्साहन भत्त्याचा प्रश्न राज्य सरकारने सोडवावा, अशी मागणी होत आहे.
भाजावळीची कामे अर्धवट
देवरुख : अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीमध्ये भाजावळीची कामे अर्धवट राहिली आहेत. १० टक्के शेतकऱ्यांनी अद्याप भाजावळ केलेली नाही. पालापाचोळा शेतात टाकण्यात आला होता. मात्र, पावसामुळे तो भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.