कर चुकव्यांविरूध्द देवरूख नगरपंचायतीची मोहीम
By Admin | Updated: April 4, 2015 00:02 IST2015-04-03T21:45:25+5:302015-04-04T00:02:08+5:30
टॉवर सील : मार्च महिना संपताच पंचायतीने घेतली आक्रमक भूमिका

कर चुकव्यांविरूध्द देवरूख नगरपंचायतीची मोहीम
देवरूख : कर थकवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा सपाटा देवरूख नगरपंचायतीने लावला आहे. सोमवारी शिवाजी चौक येथील इंडस कंपनीचा (एअरटेल, वोडाफोन, आयडिया) मनोरा सील करण्यात आला. कारवाई करताच कंपनीने थकीत कर नगरपंचायतीला अदा केल्याने मनोरा कार्यन्वीत करण्यात आला. मंगळवारी टाटा डोकोमो कंपनीचा मनोरा सील करण्यात आला आहे. कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका ग्राहकांना सहन करावा लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.मार्चअखेर असल्याने अनधिकृत बांधकामे पाडणे व दुकान गाळे सील करणे, कर थकीत असलेले मनोरे सील करणे, थकीत पाणी पट्टी ग्राहकांची नळजोडणी तोडणे, घरपट्टी थकीत असल्यास घरावर जप्ती आणणे अशी कडक मोहीम राबवली. यामुळे कर चुकवणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले. प्रथम चोरपऱ्या येथील मणेर यांचे अनधिकृत दुकाने सील करण्यात आले. त्यानंतर कांजिवरा येथील मनोरा सील करण्यात आला.
शिवाजी चौक येथे इंडस कंपनीचा मनोरा आहे. सध्या या मनोऱ्यावर एअरटेल, वोडाफोन, आयडिया कंपन्यांची यंत्रणा बसवण्यात आली आहे. या मनोऱ्याचा गेली पाच ते सहा वर्षांचा ८१ हजार रूपये कर थकीत होता. नगरपंचायतीने वारंवार नोटीसा बजावण्यात आल्या. थकीत रक्कम भरणा करण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत देण्यात आली होती. सोमवारीही कंपनीने हा कर न भरल्यामुळे नगरपंचायतीकडून हा मनोरा सील करण्यात आला. यामुळे तीनही कार्डधारकांना रेंज उपलब्ध नव्हती. कामकाज खोळंबल्याने कार्डधारकांनी नाराजी व्यक्त केली. मनोरा सील करण्याची कारवाई केल्यानंतर कंपनी खडबडून जागी झाली. कंपनीने मंगळवारी थकीत कर नगरपंचायतीकडे अदा करण्यात आला. यानंतर हा मनोरा पुन्हा कार्यन्वित झाला. टाटा डोकोमो कंपनीच्या मनोऱ्याचा ३७ हजार रूपये कर थकीत होता. त्यानाही वारंवार नोटीसा बजावण्यात आल्या. नोटीसांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नगरपंचायतीने हा मनोरा मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास सील करण्याची मोहीम राबवली. कार्डधारकांना याचा फटका सहन करावा लागणार आहे, या कारवाईने देवरूख शहरात प्रचंड खळबळ माजली आहे. अजून काही दिवस ही मोहीम राबविली जाणार आहे. (प्रतिनिधी)