खेर्डीमधील डेंग्यूच्या साथीवर नियंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:30 IST2021-09-13T04:30:38+5:302021-09-13T04:30:38+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : तालुक्यातील खेर्डी औद्योगिक वसाहतीमधील एका बेकरीमध्ये एकाचवेळी नऊ डेंग्यू रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली होती; ...

खेर्डीमधील डेंग्यूच्या साथीवर नियंत्रण
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : तालुक्यातील खेर्डी औद्योगिक वसाहतीमधील एका बेकरीमध्ये एकाचवेळी नऊ डेंग्यू रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली होती; मात्र तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. ज्योती यादव यांनी तत्काळ या ठिकाणी भेट देऊन विविध उपाययोजना राबविण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना केल्या. या बेकरीसह परिसरातून कीटकनाशक फवारणी दररोज केली जात आहे, तर साचलेल्या पाण्यामध्ये टेमीफाॅस (ॲबीट) टाकण्यात येत आहे. संपूर्ण आरोग्य यंत्रणा डेंग्यू साथ रोग उद्भवू नये म्हणून खबरदारी घेत आहे.
आरोग्य विभागाने खेर्डी औद्योगिक वसाहतीचे संपूर्ण सर्वेक्षण केले असून, डेंग्यू साथ रोग उद्भवू नये म्हणून तत्काळ खबरदारी घेत विविध उपाययोजना राबविण्यात सुरुवात केली आहे. २१ दिवस याठिकाणी आरोग्य पथक सर्वेक्षण करणार आहे. खेर्डी औद्योगिक परिसरात या नऊ व्यतिरिक्त इतर कोठेही डेंग्यू रुग्ण आढळलेला नाही.
या घटनेची खबर मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा हिवताप अधिकारी डाॅ. संतोष यादव यांनी याठिकाणी तत्काळ भेट देत विविध उपाययोजना राबविण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना केल्या आहेत. तसेच रुग्ण कामथे ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना शनिवारी घरी सोडण्यात आले. त्या सर्वांची प्रकृती ठणठणीत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, चिपळूण तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व अडरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. मयेकर यांच्या देखरेखीखाली चिपळूण तालुका आरोग्य पर्यवेक्षक डी. डी. कदम, आरोग्य सहाय्यक, आरोग्यसेवक हे कर्मचारी मेहनत घेत आहेत. विस्तार अधिकारी पुजारी, सचिन जाधव यांचेही सहकार्य लाभत आहे.