कांचन मदार यांच्या निलंबनाची मागणी

By Admin | Updated: November 4, 2015 23:57 IST2015-11-04T21:55:49+5:302015-11-04T23:57:35+5:30

चिपळूण पंचायत समिती : सभेत आक्रमक चर्चा

Demand for the suspension of Kanchan Madar | कांचन मदार यांच्या निलंबनाची मागणी

कांचन मदार यांच्या निलंबनाची मागणी

चिपळूण : कामथे उपजिल्हा रुग्णालयात महिला रूग्णांकडून प्रसुतीसाठी २ ते ४ हजार रुपये घेतले जात असल्याचा खळबळजनक आरोप पंचायत समिती सदस्य दिलीप मोरे व माजी सभापती राष्ट्रवादी गटनेते जितेंद्र चव्हाण यांनी केला. यावेळी पैसे देणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनाही सभागृहाबाहेर आणण्यात आले होते. सुमारे तासभर या विषयावर आक्रमकपणे चर्चा सुरू होती. अखेर डॉ. कांचन मदार यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे व विनापरवानगी सभागृह सोडल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी, असे ठराव मंजूर करण्यात आले. चिपळूण पंचायत समितीची मासिक सभा बुधवारी छत्रपती शिवाजी सभागृहात प्रभारी सभापती सुचिता सुवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरु झाली. यावेळी कामथे उपजिल्हा रुग्णालयाचा आढावा डॉ. कांचन मदार देत होत्या. दरम्यान, २८ आॅक्टोबर रोजी कामथे उपजिल्हा रुग्णालयात मनाली मंगेश चव्हाण (कादवड, मधलीवाडी) हिच्याकडून ३ हजार ५०० रुपये, नयना मेस्त्री (रा. गांग्रई) यांच्याकडून ४ हजार रुपये, वेदिका सुवारे (तळवडे) यांच्याकडून २ हजार रुपये प्रसुतीसाठी घेण्यात आल्याचे शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य मोरे यांनी सांगितले. माता बाल मृत्यू टाळण्यासाठी शासन महिलांना संदर्भ सेवा देते, असे असताना कामथे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांकडून पैसे घेऊन त्यांची गळचेपी केली जाते, असा आरोप मोरे यांनी केला. याच प्रश्नावर माजी सभापती चव्हाण यांनी आक्रमक रुप घेतले. शिवसेनेचे गटनेते अभय सहस्त्रबुध्दे, सदस्या पूनम शिंदे यांनीही जोरदार हल्ला चढवला. मात्र, डॉ. मदार ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. आपण कोणत्याही प्रकारे पैसे घेतले नाहीत. असेल तर तक्रार करा, असे ठामपणे सांगत होत्या. मदार यांचा स्वर उंच होता. त्यामुळे सदस्य अधिकच आक्रमक होते. आपण खोटे बोलतो का? आपल्याकडे पुरावे आहेत, असे सांगून संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांना सभागृहात बोलावण्याची अध्यक्षांकडे मोरे यांनी विनंती केली. आपण पुरावे आणले आहेत. त्यांना विचारा व सत्य काय ते जाणून घ्या. या विषयावर तासभर चर्चा सुरू होती. याप्रकरणी चौकशी करून डॉ. मदार यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी, असा ठराव सहस्त्रबुध्दे यांनी मांडला. त्याला जितेंद्र चव्हाण यांनी अनुमोदन दिले. या महिला डॉक्टर सात वर्षे एकाच ठिकाणी कशा? त्यांची त्वरित बदली करावी, असाही ठराव करण्यात आला. तसेच सभागृहातील त्यांच्या वर्तनाचा निषेध नोंदवण्यात आला. अखेर गटविकास अधिकारी शुभांगी पाटील यांनी याप्रकरणी आपण सभागृहाबाहेर कार्यवाही पूर्ण करू, तेथे खातरजमा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे सभागृह शांत झाले. डॉ. मदार थेट सभागृहाबाहेर पडल्या. सभागृहाबाहेर जाताना अध्यक्ष किंवा गटविकास अधिकारी यांची परवानगी न घेतल्याने डॉ. मदार यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सदस्य चव्हाण यांनी केली. यानंतर विविध विषयांवर शांतपणे चर्चा झाल्यावर सभाध्यक्षा सुवार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)



मदार यांनी आरोप नाकारले
आपण पैसे घेतल्याचा आळ घेतला जात आहे, तो चुकीचा आहे. कोकणात कोणी डॉक्टर येत नाहीत. मी तीनवेळा बदलीसाठी अर्ज केला आहे. माझी बदली होत नाही. मी केव्हाही जायला तयार आहे, असे उत्तर डॉ. मदार यांनी सभागृहाला दिले.


सदस्य आक्रमक : अधिकारांवरुन चर्चा
आज इतिवृत्त वाचताना सदस्य आक्रमक झाले. त्यावेळी सभाध्यक्षा सुवार यांनी मागणी करूनही आपले काम घेतले नाही. उपसभापती म्हणून मला अधिकार नाहीत का? असे विचारले. या विषयावर जोरदार चर्चा झाली. बागवे यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. सुवार यांना आपण चर्चा करून काम घेऊ, असे सांगून दोन महिने त्यांना गाफील ठेवले. त्यामुळे आज त्याही आक्रमक झाल्या. अखेर सभागृहाने सुवार यांनीही आपले काम घ्यावे, या विषयावर पडदा पडला.

Web Title: Demand for the suspension of Kanchan Madar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.