छोट्या मूर्तींना मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:06 IST2021-09-02T05:06:54+5:302021-09-02T05:06:54+5:30
देवरुख : यंदाही कोरोनाचे सावट असल्याने प्रशासनाने साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे यावर्षी साधेपणाने हा ...

छोट्या मूर्तींना मागणी
देवरुख : यंदाही कोरोनाचे सावट असल्याने प्रशासनाने साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे यावर्षी साधेपणाने हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला आहे. या उत्सवाला छोट्या गणेशमूर्तींना अधिक प्राधान्य दिले जात आहे.
पारंपरिक कला थांबल्या
लांजा : दरवर्षी गणेशोत्सवात जाकडी, नमन, भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे विघ्नहर्त्याचा मुक्काम असेपर्यंत प्रत्येक घरातील वातावरण उत्साहाने भारलेले असते. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने आली आहेत. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून पारंपरिक कला थांबल्या आहेत.
मोबाइल टॉवर बंद
गुहागर : तालुक्यातील निओशी भेलेवाडी हद्दीतील झरीचा कातळ या ठिकाणी बीएसएनएलचा मोबाइल टॉवर उभारण्यात आला आहे. परंतु गेल्या तीन वर्षांपासून हा टॉवर बंद स्थितीत आहे. या कंपनीकडून टॉवरचे नेटवर्क सुरू करण्याबाबत अद्याप कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.
झाडी तोडण्याची मागणी
रत्नागिरी : ग्रामीण भागासह शहरातील अनेक रस्त्यांवर सध्या काटेरी झुडपे, गवत वाढले आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे गणपतीच्या आगमनापूर्वी काटेरी झुडपे आणि गवत तोडावे अशी मागणी अनेक वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
कोरोना नियमांचे उल्लंघन
मंडणगड : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या अनुषंगाने कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. परंतु या आदेशांचे उल्लंघन नागरिकांबरोबरच अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी करीत असल्याचे मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.